पुणे, पिंपरी चिंचवडवर पाणी कपातीची टांगती तलवार; १५ टक्क्यांनी कपात करावी, जलसंपदाचे महापालिकांना निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 10:46 IST2026-04-09T10:46:34+5:302026-04-09T10:46:44+5:30
पाणीकपात न केल्यास भविष्यात पाणीटंचाई निर्माण झाल्यास त्याची थेट जबाबदारी महापालिकेची असेल असेही जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.

पुणे, पिंपरी चिंचवडवर पाणी कपातीची टांगती तलवार; १५ टक्क्यांनी कपात करावी, जलसंपदाचे महापालिकांना निर्देश
पुणे : भारतीय हवामानशास्त्र विभागाने यंदा पावसाचे प्रमाण कमी राहील असा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे खडकवासला प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन हे पाणी ३१ जुलैपर्यंत कशा प्रकारे पुरविता येईल, याचे नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे महापालिकेने आतापासूनच महिन्याला उचलल्या जाणाऱ्या पाणी कोट्यात १५ टक्के पाणीकपात करावी असे निर्देश जलसंपदा विभागाने महापालिकेला दिले आहेत. पाणीकपात न केल्यास भविष्यात पाणीटंचाई निर्माण झाल्यास त्याची थेट जबाबदारी महापालिकेची असेल असेही जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे. विभागाने पुणे महापालिकेसह, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि एमआयडीसीला अशीच सूचना केली आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने यंदाच्या मान्सूनवर ‘अल-निनो’ व ‘आयओडी’ चा प्रभाव असल्याने एकूण पाऊसमान कमी असेल असा इशारा दिला आहे. याबाबत नुकत्याच संपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यानुसार पाण्याचे नियोजन करावे, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे कृष्णा व गोदावरी खोऱ्यातील उपलब्ध पाणीसाठ्याच्या काटेकोर वापरण्यासंदर्भात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाणी जपून वापरण्याबाबत विभागाला सूचना दिल्या आहेत.
त्यानुसार खडकवासला विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी महापालिकेला याबाबत महिन्याच्या उचलण्यात येणाऱ्या पाणी कोट्यात १५ टक्के पाणीकपात करण्याचे निर्देश दिले आहेत. धरणातील उपलब्ध पाणीसाठा आणि भविष्यात अवर्षणप्रवण परिस्थिती निर्माण झाल्यास आतापासूनच पेयजलाचे नियोजन करणे गरजेचे आहे. जेणेकरून ३१ जुलैपर्यंत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे शक्य होईल आणि पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही. त्यासाठी पिण्याच्या पाण्याचे आपल्या स्तरावर योग्य ते नियोजन करण्यात यावे, असेही देशमुख यांनी महापालिकेला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
शहराला खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. महापालिका दररोज १७५० दशलक्ष लिटर पाणी उचलते. त्यानुसार महिन्याला १.८३ टीएमसी पाणी दर महिन्याला उचलले जाते. जलसंपदा विभागाच्या सूचनेनुसार आता महापालिकेला ०.२७५ टीएमसीची पाणीकपात करावी लागणार आहे. या चारही धरणांत मिळून बुधवारी (दि. ८) १३.२० टक्के म्हणजे ४५.२९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच दिवशी १२.०४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा एक टीएमसीहून अधिक जादा पाणीसाठा शिल्लक आहे. जलसंपदा विभागाच्या या निर्देशांवर आता महापालिका काय भूमिका घेते, याकडे जलसंपदा विभागाबरोबरच पुणेकरांचेही लक्ष लागून आहे.