मावळात 'जलजीवन मिशन'मध्ये मुरतेय पाणी; जलवाहिनीचे काम अपूर्ण ठेवून निधी खर्च
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 14:29 IST2026-05-10T14:29:37+5:302026-05-10T14:29:48+5:30
- नळजोडण्यांचाही नाही पत्ता; महागावच्या ग्रामस्थांची जिल्हा परिषदेकडे तक्रार

मावळात 'जलजीवन मिशन'मध्ये मुरतेय पाणी; जलवाहिनीचे काम अपूर्ण ठेवून निधी खर्च
पवनानगर : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशनचा प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी पोहोचविण्याचा उद्देश असताना, मावळ तालुक्यातील काही गावांतील कामांमध्ये गंभीर अनियमितता समोर येत आहे. तालुक्यातील महागावच्या ग्रामस्थांनी थेट जिल्हा परिषदेकडे लेखी तक्रार दाखल करत, कामे अपूर्ण ठेवून निधी खर्च करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे.
ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे की, गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. याद्वारे प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार होते. मात्र प्रत्यक्षात अनेक वाड्धांमध्ये अद्यापही कामे अपूर्ण असून पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
महागाव ग्रामपंचायत हद्दीतील मालेवाडी, धालेवाडी, निकमवाडी, दत्तवाडी, प्रभाचीवाडी आदी भागांमध्ये जलवाहिनीचे काम पूर्ण झालेले नाही. काही ठिकाणी वाहिन्या टाकण्यात आल्या असल्या तरी नळजोडणी नाही, तर काही भागात काम अर्धवट सोडून देण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे एन उन्हाळ्यात नागरिकांची पाण्यासाठी गैरसोय होत असल्याचे सांगण्यात आले आहे.
निवेदनात संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप केले आहेत. काम पूर्ण न करताच निधी खर्च दाखविण्यात आला असून यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची शक्यता आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.
पाण्यासाठी पायपीट कमी करण्याचा उद्देश
या योजनेअंतर्गत ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे नियमित पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जलशुद्धीकरण व्यवस्था, पाइपलाइन टाकणे व पाण्यासाठी होणारी पायपीट कमी करणे.
कागदोपत्री कामे पूर्ण
अनेक गावांमध्ये कागदोपत्री कामे पूर्ण दाखवून प्रत्यक्षात नागरिकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे प्रशासनाने संपूर्ण तालुक्यातील जलजीवन मिशनच्या कामांची तपासणी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अनेक गावमधील कामे अपूर्ण आहेत. त्या कामामध्येही अनियमितता आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जलजीवन मिशनसारखी महत्त्वाची योजना गावासाठी मंजूर झाली; मात्र प्रत्यक्षात अनेक वाड्यांमध्ये आजही पाण्याची समस्या कायम आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे. काम अपूर्ण ठेवून निधी खर्च झाल्याचा संशय आहे. या प्रकरणातील दोर्षीवर कठोर कारवाई झाली पाहिजे. ग्रामीण भागातील नागरिकांना अजूनही पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. - गणेश विलास साबळे, ग्रामस्थ