बिघाडामुळे ‘वंदे भारत’ थांबली; तत्पर दुरुस्तीमुळे तीन तासांत पुन्हा धावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 13:33 IST2026-05-06T13:33:12+5:302026-05-06T13:33:45+5:30

- पुणे स्थानकावरून सुटलेली ही गाडी जेजुरी-वाल्हेदरम्यान दातेवाडी येथे आडरानात थांबली.

pune news vande Bharat stopped due to malfunction; ran again in three hours due to prompt repairs | बिघाडामुळे ‘वंदे भारत’ थांबली; तत्पर दुरुस्तीमुळे तीन तासांत पुन्हा धावली

बिघाडामुळे ‘वंदे भारत’ थांबली; तत्पर दुरुस्तीमुळे तीन तासांत पुन्हा धावली

नीरा :पुणे-हुबळी मार्गावरील वेगवान वंदे भारत एक्स्प्रेसला पॅन्टोग्राफमधील कार्बन स्ट्रिप तुटल्याने सोमवारी (दि. ४ मे) दुपारी अचानक थांबावे लागले. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या तातडीच्या प्रतिसादामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला आणि तीन तासांच्या विलंबानंतर गाडी पुन्हा मार्गस्थ करण्यात आली. या घटनेदरम्यान प्रवाशांना काही काळ मनस्ताप सहन करावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे स्थानकावरून सुटलेली ही गाडी जेजुरी-वाल्हेदरम्यान दातेवाडी येथे आडरानात थांबली. अचानक गाडी थांबल्याने प्रवाशांमध्ये काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. कारण समजत नसल्याने अनेक प्रवासी गाडीतून खाली उतरून पुढील बाजूस गर्दी करत होते.

प्राथमिक तपासात गाडीच्या पॅन्टोग्राफवरील कार्बन स्ट्रिप तुटल्यामुळे ओव्हरहेड वीजपुरवठा खंडित झाल्याचे स्पष्ट झाले. घटना समजताच रेल्वेच्या तांत्रिक पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत सर्व आवश्यक खबरदारी घेण्यात आली. तांत्रिक कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करत दोषग्रस्त पॅन्टोग्राफ बदलून नवीन यंत्रणा बसवली. जवळपास तीन तासांच्या प्रयत्नांनंतर गाडी पुन्हा सुरू करण्यात यश आले. त्यानंतर गाडी सावधगिरीने पुढे मार्गस्थ करण्यात आली.

या बिघाडामुळे वंदे भारत एक्स्प्रेस तीन तास उशिराने धावली. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या वेगवान कार्यवाहीमुळे कोणतीही जीवितहानी किंवा अपघात टळला. हा केवळ तांत्रिक बिघाड असून, कोणताही अनुचित प्रकार घडलेला नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

रेल्वे कर्मचाऱ्यांची माणुसकी

गाडी आडरानात थांबल्याने त्रस्त झालेल्या प्रवाशांना वाल्हे येथील रेल्वे कर्मचाऱ्यांनी दिलासा दिला. त्यांनी पुढाकार घेत प्रवाशांना चहा व पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले. या मदतीमुळे संतप्त प्रवाशांचा राग काहीसा निवळला आणि कर्मचाऱ्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.   पुणे-मिरज लोहमार्गावरील पुरंदर तालुक्यातील दातेवाडी येथील आडरानात बंद पडलेली वेगवान वंदे भारत ट्रेन.

Web Title : खराबी के कारण वंदे भारत रुकी, मरम्मत के बाद फिर से शुरू हुई यात्रा

Web Summary : पुणे के पास वंदे भारत एक्सप्रेस पैंटोग्राफ की समस्या के कारण रुकी। रेलवे कर्मचारियों द्वारा त्वरित मरम्मत से ट्रेन तीन घंटे की देरी के बाद अपनी यात्रा फिर से शुरू कर सकी। यात्रियों को जलपान कराया गया, जिससे बड़ा व्यवधान टल गया।

Web Title : Vande Bharat Express Halted by Malfunction, Resumes Journey After Repair

Web Summary : A Vande Bharat Express was halted near Pune due to a pantograph issue. Quick repairs by railway staff ensured the train resumed its journey after a three-hour delay. Passengers were provided with refreshments, averting major disruption.