देशातील प्रत्येक महिलेला दहा हजार रुपये द्या; उद्धव ठाकरेंची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 18:31 IST2025-10-04T18:25:33+5:302025-10-04T18:31:25+5:30
- या आपल्या लाडक्या बहिणी आहेत. त्यांना कधीही रडू देऊ नका. त्यांच्या पाठीशी उभे, रहा असे आदेशही ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले.

देशातील प्रत्येक महिलेला दहा हजार रुपये द्या; उद्धव ठाकरेंची मागणी
पुणे : विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दोन-तीन महिन्यांचे पैसे एकाचवेळी जमा करण्यात आले होते. आताही पुढील सहा महिन्यांचे हप्ते एकदम द्या. सध्या लाडक्या बहिणींना या पैशांची गरज आहे. पण सरकार महिलांची फसवणूक करत आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७५ लाख महिलांच्या खात्यावर प्रत्येकी दहा हजार रुपये जमा केले आहेत. “तुम्हाला बिहारमधील महिला जास्त लाडक्या आहेत आणि महाराष्ट्रातील बहिणी कमी लाडक्या आहेत का?” असा संतप्त सवाल ठाकरे यांनी केला. तसेच, निवडणुकीच्या निमित्ताने मर्यादित मदत न करता देशातील प्रत्येक महिलेला दहा हजार रुपये द्या, अशी मागणीही त्यांनी केली.
अजित नागरी पतसंस्था महिला बचतगटातील कर्जदार महिलांना कर्जमुक्तीची प्रमाणपत्रे ठाकरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आली. या वेळी खासदार संजय राऊत, उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक, आमदार मिलिंद नार्वेकर, जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर, सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, राज्य संघटक वसंत मोरे, शहरप्रमुख संजय मोरे आणि गजानन थरकुडे उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, “गडगंज उद्योगपती संपत्ती लुटून परदेशात पळून गेले. त्यांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ झाले. उलट शेतकरी कधीही कर्ज घेऊन पळून जात नाही. जेव्हा त्यांच्या घरावर बँका कर्जाची नोटीस लावतात, तेव्हा बदनामी नको म्हणून शेतकरी आत्महत्या करतो. तो देश सोडत नाही, पण प्राण सोडतो. त्यामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना तातडीच्या मदतीची गरज आहे. सत्ता असो वा नसो, शिवसेना तुमच्या मदतीसाठी आहे.”
शिवसैनिकांनो, लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभे रहा
वसंत मोरे तात्यांनी आशीर्वादाचा दंडुका हातात घेतला आणि तुमचे कर्ज माफ झाले. हा आनंदाचा दिवस आहे. माता-भगिनींनी दिलेला हा आशीर्वाद म्हणजे मातृशक्तीचा आशीर्वाद आहे. या आपल्या लाडक्या बहिणी आहेत. त्यांना कधीही रडू देऊ नका, त्यांच्या पाठीशी नेहमी उभे रहा,” असे आदेश ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले.