एकाचे काढुन दुसऱ्याला देण्यात सरकारला रस नाही; चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 15:53 IST2025-09-02T15:51:39+5:302025-09-02T15:53:29+5:30
- चर्चा करण्याची पद्धत असते. आम्ही आरक्षणाबाबत मंत्रीमंडळाची उपसमिती स्थापन केली. या समितीच्या दररोज बैठका होत आहेत. ते चर्चा करत आहेत. सरकार त्यांच्या संपर्कात आहे.

एकाचे काढुन दुसऱ्याला देण्यात सरकारला रस नाही; चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितले
पुणे: एकाच्या ताटातील काढुन घेऊन ते दुसऱ्याला द्यायचे असे करण्यात आमच्या सरकारला रस नाही, टिकणारे आरक्षण द्यायचा आमचा प्रयत्न आहे असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. पुण्यातील मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी बावनकुळे मंगळवारी पुण्यात आले होते.
मुंबईत सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनावर पत्रकारांबरोबर बोलताना त्यांनी सरकार आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे या आरोपांचा नकार केला. ते पुढे म्हणाले, चर्चा करण्याची पद्धत असते. आम्ही आरक्षणाबाबत मंत्रीमंडळाची उपसमिती स्थापन केली. या समितीच्या दररोज बैठका होत आहेत. ते चर्चा करत आहेत. सरकार त्यांच्या संपर्कात आहे. तोडगा मिळत नाही तोपर्यंत आंदोलकांशी चर्चा करणार तरी कशी? त्यांची मागणी सरसकट सर्व मराठ्यांना ओबीसी आरक्षण, तेही ओबीसी कोट्यातून अशी आहे. हे करता येणार नाही. घटनेची चौकट आहे. मग काय करता येईल यावर विचार करूनच आम्ही कुणबी नोंदी तपासण्याचा व ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय मागेच घेतला. त्याप्रमाणे कामही सुरू आहे. मराठवाड्यात अशी कितीतरी प्रमाणपत्र वितरीतही करण्यात आली.
ते काम थांबलेले नाही, सुरूच आहे हे आंदोलकांनी लक्षात घ्यायला हवे असे बावनकुळे म्हणाले. आरक्षण द्यायचे तर किमान काही पुरावा असावा. ज्यांचे असे पुरावे मिळतात, त्यांना लगेच कुणबी प्रमाणपत्र दिले जाते. पुरावेच नाहीत, त्यांना देता येणार नाही. घटनेच्या चौकटीबाहेर जाऊन काहीच करता येणार नाही. न्यायालयाने मराठा आरक्षण आंदोलनाबाबत काही आदेश दिले आहेत. त्याचे पालन व्हावे अशी अपेक्षा आहे. न्यायालयाने सरकारलाही आदेश दिलेत. त्याप्रमाणे सरकारने कारवाई सुरू केली आहे अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.
सरकारमध्ये या आरक्षण विषयापासून उपमुख्यमंत्री अजित पवार अलिप्त दिसतात, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही सहभाग दिसत नाही. देवेंद्र फडणवीस यांना एकटे पाडण्याचा हा प्रकार आहे का? या प्रश्नावर बावनकुळे यांनी यात काहीही तथ्य नसल्याचे सांगितले. आमचे २३७ आमदार आहेत. ५१ टक्के मते घेऊन आम्ही सत्तेवर आलो आहोत. राज्यातील १४ कोटी जनतेची देवेंद्र फडणवीस सरकारला मान्यता आहे. तीनही पक्षांचे काम व्यवस्थित सुरू आहे. त्यांच्यात संवाद आहे. त्यांनी दररोज एकमेकांबरोबर बोललेच पाहिजेत असा आग्रह कशासाठी? न बोलताही ते काम करत आहेत असा दावा बावनकुळे यांनी केला. कसबा गणपतीबरोबरच शहरातील मानाच्या पाचही गणपतींचे दर्शन.बावनकुळे यांनी घेतले. त्यांच्यासमवेत राजेश पांडे तसेच भारतीय जनता पक्षाचे अन्य संघटनात्मक पदाधिकारी होते.