तो पक्षप्रवेश चुकीचा होता, लक्षात येताच लगेच काढून टाकलं; पुण्यातील 'त्या' पक्षप्रवेशाविषयी अजित पवारांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 10:54 IST2025-10-10T10:53:45+5:302025-10-10T10:54:36+5:30
तुमच्यावर अन्याय झाला तर सर्वस्व पणाला लावीन; पण तुमचाच हात जर एखाद्या प्रकरणात खराब झाला असेल, तर तुम्हाला पाठीशी घालायला आम्ही मोकळे नाही आणि आमच्याकडून ते होणारही नाही.”

तो पक्षप्रवेश चुकीचा होता, लक्षात येताच लगेच काढून टाकलं; पुण्यातील 'त्या' पक्षप्रवेशाविषयी अजित पवारांची प्रतिक्रिया
पुणे: गुंड निलेश घायवळ आणि त्याचे राजकीय नेत्यांशी असलेले संबंध याची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे. या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपांचे सत्र रंगले आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात झालेल्या एका जुन्या पक्षप्रवेशाची आठवण करून दिली. चुकीच्या व्यक्तीचा पक्षप्रवेश झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्या व्यक्तीला पक्षातून बाहेर काढल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच, पक्षातील कार्यकर्त्यांना अप्रत्यक्ष इशाराही दिला.
आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, “पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मी स्पष्ट सांगितलं होतं, तुमच्यावर अन्याय झाला तर मी सर्वस्व पणाला लावीन; पण तुमचाच हात एखाद्या गैरप्रकरणात खराब झाला असेल, तर तुम्हाला पाठीशी घालायला आम्ही मोकळे नाही, आणि आमच्याकडून ते होणारही नाही.”
ते पुढे म्हणाले, “मागच्या काळात मी काहींना पक्षप्रवेश दिला होता. त्यात आजम पानसरे यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर काहीतरी गडबड असल्याचं लक्षात आलं. चुकीच्या व्यक्तीला प्रवेश दिल्याचं उमजताच मी लगेच संध्याकाळी त्याला पक्षातून काढून टाकलं. त्यामुळे प्रत्येकाला माझा स्वभाव माहित आहे.”
दरम्यान, निलेश घायवळ प्रकरणावर भाष्य करताना पवार म्हणाले,“या प्रकरणात मी स्वतः पोलीस आयुक्तांना सांगितलं आहे, कुणीही असो, कुठल्याही पक्षाचा असो, जर त्याने कायदा हातात घेतला किंवा नियमांचं उल्लंघन केलं, तर त्याच्यावर कठोर कारवाई करा.”
सचिन घायवळ यांच्या बंदुकीच्या परवान्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शिफारस केली होती, मात्र तरीही त्यांना परवाना दिला नसल्याचं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपल्याला सांगितल्याचं अजित पवार यांनी नमूद केलं. शेवटी पवार म्हणाले,“पुणे असो किंवा इतर कुठेही, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. आणि मी त्यात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही.” असा इशारा अजित पवार यांनी दिला.