Indapur Rains: इंदापुरात पावसाने शेतकऱ्यांना पुन्हा रडवले; दोनवेळा पीक नुकसानीचे पंचनामे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 10:18 IST2025-10-01T10:17:56+5:302025-10-01T10:18:21+5:30
Indapur Rains: महसूल विभागाला दोनवेळा पीक नुकसानीचे पंचनामे करण्याची वेळ आली आहे.

Indapur Rains: इंदापुरात पावसाने शेतकऱ्यांना पुन्हा रडवले; दोनवेळा पीक नुकसानीचे पंचनामे
इंदापूर : यंदाच्या पावसाळ्याने इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दोनवेळा अश्रू ढाळण्याची वेळ आणली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील मुसळधार पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले आणि आता परतीच्या पावसाने पुन्हा एकदा पिकांची नासाडी केली आहे. या दोन्ही घटनांमुळे महसूल विभागाला दोनवेळा पीक नुकसानीचे पंचनामे करण्याची वेळ आली आहे.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने ८,५९९ शेतकऱ्यांच्या २४,७७१.६६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये १,८००.१९ हेक्टर बागायती क्षेत्र, १५५.५६ हेक्टर फळपिके, १,८१०.२९ हेक्टर इतर पिके आणि ५०५ हेक्टर क्षेत्रावरील जमीन खरडून जाण्याच्या घटना समाविष्ट होत्या. या नुकसानीसाठी ५ कोटी ५७ लाख ५८ हजार ६१० रुपयांची भरपाई मंजूर झाली. बागायती क्षेत्रासाठी प्रतिहेक्टर १७,००० रुपये, फळबागांसाठी २३,००० रुपये आणि जमीन खरडून जाण्यासाठी ४७,००० रुपये याप्रमाणे ही रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यास सुरुवात झाली आहे.
परतीच्या पावसाने झोडपले
मागील आठवड्यात परतीच्या पावसाने पुन्हा एकदा पिकांचे नुकसान केले. आतापर्यंत ८२५ हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले असून, जून-जुलैमध्ये नदीकाठच्या आणि लवणात पेरलेल्या पिकांचा समावेश आहे. यंदाच्या खरीप हंगामात मक्याची २८३.३ टक्के (१८,४१६ हेक्टर), उडदाची ११३.२ टक्के (२१९.५ हेक्टर), सोयाबीनची ११९.३ टक्के (२६०.५ हेक्टर), कांद्याची १६८.५ टक्के (५२९ हेक्टर) आणि टोमॅटोची २११.४ टक्के (३०४.४ हेक्टर) पेरणी झाली होती. याशिवाय, चाऱ्याच्या पिकांमध्ये मक्याच्या चाऱ्याची २१९.१ टक्के (४,४१०.१० हेक्टर) आणि कडवळाची १६३.५ टक्के (१,९२७.८ हेक्टर) पेरणी झाली होती. या पिकांचे बहुतांश ठिकाणी नुकसान झाल्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांपुढील संकट
एका वर्षात एकाच पिकासाठी दोनवेळा नुकसानभरपाई देण्याची तरतूद नसल्याने, दोनदा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे आहे. परतीच्या पावसाने सोयाबीनसारख्या पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली असून, वरकुटे बुद्रुक येथील शेतातील दृश्य या संकटाचे मूक साक्षीदार आहे.
शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाईच्या रकमेची प्रतीक्षा आहे. मात्र, एकाच हंगामात दोनदा झालेल्या नुकसानीमुळे त्यांचा हिरमोड झाला आहे. महसूल विभागाकडून पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू असली, तरी शेतकऱ्यांच्या आशा धूसर झाल्या आहेत.