प्राथमिक शिक्षकांवर 'ऑनलाइन ओझे'; सकाळी लिंक, दुपारी फोन;शिक्षकांचा दिवस 'एक्सेल'मध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 10:04 IST2025-10-05T10:01:07+5:302025-10-05T10:04:13+5:30
गुणवत्तापूर्ण शिक्षण धोक्यात येत असल्याची चिंता शिक्षक संघटनांनी व्यक्त केली असून, प्रशासनाने यावर निर्बंध घालण्याची मागणी केली आहे.

प्राथमिक शिक्षकांवर 'ऑनलाइन ओझे'; सकाळी लिंक, दुपारी फोन;शिक्षकांचा दिवस 'एक्सेल'मध्ये
- बी. एम. काळे
जेजुरी : प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना दैनंदिन अध्यापनाव्यतिरिक्त अशा भरमसाट ऑनलाइन कामांची पूर्तता करावी लागत आहे की, विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्याऐवजी त्यांचा संपूर्ण दिवस मोबाईल-लॅपटॉपवर माहिती भरण्यातच उडवून लावला जातोय. विविध संस्था आणि डायटमार्फत दररोज नवनवीन माहितीच्या मागण्या येत असून, आकस्मिक आदेशांमुळे शिक्षकांचा बहुतांश वेळ अहवाल, यादी आणि एक्सेलशीट्समध्ये खर्च होतो. यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण धोक्यात येत असल्याची चिंता शिक्षक संघटनांनी व्यक्त केली असून, प्रशासनाने यावर निर्बंध घालण्याची मागणी केली आहे.
प्राथमिक शाळांमध्ये सध्या असा प्रवास चालू आहे की, सकाळी शाळेत वर्ग सुरू करायला गेलो तरी व्हॉट्सॲपवर नवी लिंक धडकते. ती लगेच भरली नाही तर वरून फोन येतो. विद्यार्थी वर्गात बसलेले, पण शिक्षक मात्र स्क्रीनवर अडकलेले. सकाळची एक मागणी पूर्ण केली की दुपारी नवी मागणी. महिन्यातील १७-१८ दिवस असे आकस्मिक आदेश व्हॉट्सॲपद्वारे धडकविले जातात. यात झेरॉक्स, यादी, अहवाल यांचा समावेश असतो, ज्यामुळे वर्गात शिकविण्यासाठी वेळच उरत नाही, असा आरोप शिक्षकांनी केला आहे.
१००-१५० प्रकारची माहिती
पुणे जिल्हा कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष विनोद चव्हाण यांनी सांगितले की, "शिक्षकांना शंभर ते दीडशे प्रकारच्या ऑनलाइन माहिती भराव्या लागतात. यात निपुण मूल्यांकन, निपुण पुणे, 'एक पेड मॉम के नाम', स्वच्छ विद्यालय, ड्रॉप बॉक्स, शालेय पोषण आहार, साक्षरता मोहीम, पालक सभा, परीक्षा केंद्र, निपुण भारत, माय भारत, यू-डायस अपडेट, दिक्षा ॲप, विविध पोर्टल्स आणि शासन योजना यांचा समावेश आहे. या सर्व माहिती वारंवार मागितल्या जातात, ज्यामुळे अध्यापनावर परिणाम होतो."
पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष दत्तात्रय गायकवाड म्हणाले, "वर्गात मुलं बसलेली असतात, आम्हाला मात्र मोबाईलवर माहिती भरावी लागते. नाहीतर लगेच व्हॉट्सॲपवर माहिती भरण्यासाठी मेसेज येतो. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होतेय." तर पुरंदर तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष सुनील कुंजीर यांनी नमूद केले की, "एखाद्या दिवशी सकाळी माहिती दिली तर दुपारी नवी मागणी. शिकवण्यापेक्षा कागदपत्रे आणि लिंक भरण्यातच शिक्षक व मुख्याध्यापकांचा बहुतांश वेळ जातो."
प्रशासनाने नियंत्रण आणायला हवं
पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष नारायण कांबळे यांनी सांगितले की, "गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांना वर्गात वेळ हवा. ऑनलाइन कामांच्या ओझ्यामुळे अध्यापन मागे पडतंय. प्रशासनाने यावर नियंत्रण आणायलाच हवं." पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संदीप कदम यांनी गेल्यावर्षीच्या आंदोलनाचा उल्लेख करून सांगितले की, "३० सप्टेंबर २०२४ रोजी आम्ही सामूहिक रजा घेऊन 'ऑनलाइन कामे कमी करा' म्हणून पुण्यात सर्व शिक्षक व शिक्षक संघटनांनी एकत्रितरीत्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. पण, त्यानंतर कामे कमी न होता उलट वाढली आहेत."
शिक्षक संघटनांनी याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे आणि वारंवार माहिती मागविण्यावर निर्बंध घालावेत, अशी मागणी पुन्हा एकदा केली आहे. अन्यथा, गुणवत्तापूर्ण शिक्षणावर दीर्घकालीन परिणाम होईल, असा इशाराही त्यांनी दिला.