सुसज्ज रस्ते, सोयीसुविधा असणारे म्हाडाचे लेआउट मंजूर करावेत;उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 09:39 IST2025-09-10T09:38:42+5:302025-09-10T09:39:11+5:30

- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश, म्हाडाच्या कामांचा घेतला आढावा

pune news MHADA layouts with well-equipped roads and amenities should be approved | सुसज्ज रस्ते, सोयीसुविधा असणारे म्हाडाचे लेआउट मंजूर करावेत;उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

सुसज्ज रस्ते, सोयीसुविधा असणारे म्हाडाचे लेआउट मंजूर करावेत;उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

पुणे :पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील सर्व स्थानिक नियोजन प्राधिकरणांनी सुसज्ज रस्ते, सोयीसुविधा असणारे म्हाडाचे लेआउट मंजूर करून प्रकरणानुसार एकल किंवा समूह पुनर्विकास करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या विविध विषयांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांच्या कामांचाही पवार यांनी सविस्तर आढावा घेतला. पंतप्रधान आवास योजना २.० ची प्रभावी अंमलबजावणी करावी. परवडणाऱ्या दरात सामान्यांना घरे उपलब्ध करून द्यावीत. मुंबईतील बीडीडी चाळींच्या धर्तीवर बांधकामाचा दर्जा उत्तम ठेवून प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

मुळशी तालुक्यातील नेरे, खेड तालुक्यातील रोहकल येथे पंतप्रधान आवास योजनेची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच शिरूर तालुक्यात म्हाडाच्या जागेमध्ये उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पातील अडथळे दूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी. खराडी येथील म्हाडा अभिन्यासातील पोस्ट ऑफिस आरक्षण रद्द करणे, लोणावळा नगरपरिषद हद्दीतील म्हाडाच्या मालकीच्या जागांवर पुनर्विकास व नवीन बांधकाम इत्यादी विषयांवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. दापोडी येथील अशोक गृहनिर्माण संस्थेमधील पात्र सदस्यांना तेथील म्हाडाच्या २० टक्के आरक्षणानुसार सोडत न काढता योजनेत समाविष्ट करून घ्यावे, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.

या बैठकीस पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नगरविकास व गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडे, म्हाडा पुणेचे मुख्याधिकारी राहुल साकोरे हे मंत्रालयातून तर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महापालिका आयुक्त नवल किशोर राम हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

Web Title: pune news MHADA layouts with well-equipped roads and amenities should be approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.