सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे महापौरांचे आवाहन, मात्र पदाधिकाऱ्यांचे मौन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 13:25 IST2026-05-14T13:23:00+5:302026-05-14T13:25:16+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सार्वजनिक वाहतुकीलाच प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे.

सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे महापौरांचे आवाहन, मात्र पदाधिकाऱ्यांचे मौन
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ‘सामूहिक राष्ट्रीय जबाबदारी’च्या आवाहनाला प्रतिसाद देत नगरसेवक-नगरसेविकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, तसेच शक्य तेव्हा ‘कारपुलिंग’चा पर्याय अवलंबावा, असे आवाहन महापौर मंजूषा नागपुरे यांनी केले आहे. दुसरीकडे पदाधिकारी मात्र, याबाबत मौन पाळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या आर्थिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार इंधन बचत, परकीय चलनाची बचत आणि स्वावलंबी भारत उभारणीसाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढविणे अत्यावश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सार्वजनिक वाहतुकीलाच प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे.
पंतप्रधानांच्या या आवाहनास शहर भाजप आणि महापालिकेतील सत्ताधारी कसा प्रतिसाद देणार, या आवाहनाच्या अनुषंगाने स्वपक्षाच्या पदाधिकाऱ्यांना, नगरसेवकांना आणि कार्यकर्त्यांना काय आदेश देणार, याबाबत पदाधिकाऱ्यांचे काय मत आहे?, हे जाणून घेण्याचा ‘लोकमत’ने दोन दिवस प्रयत्न केला. या कालावधीत शहराध्यक्ष धीरज घाटे यांना वारंवार फोन केले. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. याच कालावधीत महापालिकेतील एका पदाधिकाऱ्यास विचारणा केली. शहरातील अनेक प्रभागांत चारही नगरसेवक भाजपचे आहेत. या नगरसेवकांनी महापालिकेत येण्यासाठी स्वतंत्र गाड्या आणण्यापेक्षा चौघांनीही एकाच गाडीचा वापर करावा, असे काही आवाहन करणार अहात का, असे विचारल्यानंतर या पदाधिकाऱ्याने सुरुवातीस मौन पाळणे पसंत केले. त्यानंतर आम्ही केवळ इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर करा, असे सांगू असे म्हणत जास्त बोलणे टाळले.
अखेर महापौर नागपुरे यांनी पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार नगरसेवक, नगरसेविका आणि कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, तसेच शक्य तेव्हा ‘कारपुलिंग’चा पर्याय अवलंबावा, आठवड्यातून किमान एक दिवस खासगी वाहनांचा वापर टाळून सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, असा प्रस्ताव मांडला आहे.
या उपक्रमाद्वारे नागरिकांमध्ये योग्य संदेश जाऊन त्याचे चळवळीत रूपांतर होईल व शहरात पर्यावरणपूरक आणि शाश्वत वाहतुकीला चालना मिळेल, असा प्रस्ताव महापौरांनी आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे दिला असून, तातडीने कार्यवाही करण्याची सूचना केली आहे.
पालिका वाहनांच्या संख्येत ३० टक्क्यांनी करणार घट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेलची बचत करावी, असे आवाहन केले आहे. त्यानुसार पालिका वाहनांच्या संख्येत ३० टक्क्यांनी घट करणार आहे. त्यादृष्टीने नियोजन सुरू आहे, असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.