मुसळधार पावसामुळे पुण्यात वर्क फ्रॉम होम अनिवार्य करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 18:58 IST2025-08-19T18:57:19+5:302025-08-19T18:58:21+5:30
- आयटी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची मुभा देण्याची मागणी फोरम फॉर आयटी एम्प्लॉयीने केली

मुसळधार पावसामुळे पुण्यात वर्क फ्रॉम होम अनिवार्य करण्याची मागणी
पुणे : पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांवर पाणी साचले असून, वाहतुकीची कोंडी वाढली आहे. अशा परिस्थितीत आयटी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची मुभा देण्याची मागणी फोरम फॉर आयटी एम्प्लॉयीने केली आहे. तसेच अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम दिले नसल्याने या बाबतीत तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाने परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता तत्काळ वर्क फ्रॉम होम अनिवार्य करण्याची मागणी केली आहे.
पावसामुळे हिंजवडी, खराडी, हडपसर, येरवडा, बाणेर आणि बालेवाडी या आयटी परिसरातील रस्ते जलमय झाले आहे. तसेच बससेवा वेळेवर नाहीत, अनेक कर्मचारी पावसात बाइक व कारने प्रवास करत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीने प्रवासाचा वेळ दुप्पट झाला असून कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. पावसामुळे पुणे शहर आणि उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित होणे, झाडे पडणे, वाहतूक कोंडी तसेच अपघात अशा घटना नोंदवल्या गेल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर आयटी क्षेत्रातील कंपन्यांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना काढून, वर्क फ्रॉम होम सक्तीचे करावे, अशी मागणी फोरमने प्रशासनाकडे केली आहे.
फोरम फॉर आयटी एम्प्लॉयी संघटनेचे अध्यक्ष पवनजीत माने म्हणाले, मुसळधार पावसाचा अंदाज असताना देखील प्रशासनाने ठोस पावले उचलायला हवी होती. अनेक कंपन्यांमध्ये हायब्रिड पद्धतीने काम चालते त्यांनी वर्क फ्रॉम होम जाहीर केले, मात्र अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमला दुजोरा दिलेला नाही. अशा परिस्थितीत कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे जीवन धोक्यात न घालता वर्क फ्रॉम होमचा पर्याय खुला ठेवायला हवा. तसेच प्रशासनाने याकडे गंभीरतेने लक्ष देत तत्काळ आदेश काढणे गरजेचे आहे. पुण्याची सध्याची पायाभूत सुविधांची स्थिती पाहता वर्क फ्रॉम काळाची गरज आहे.
कंपनीकडून कॅब सुविधा आहे. दुपारची शिफ्ट २.१५ वाजता सुरू होते. वाहतूक कोंडीचा अंदाज घेता इतर वेळी दुपारी १ वाजता असलेला पिकअप आज १२ वाजताच दिला. त्यातही मला पोहोचायला २ वाजले. जर कंपनीने वर्क फ्रॉम दिले असते तर, हा वेळ वाया गेला नसता. - गणेश शिंदे (आयटी कर्मचारी)
- पहाटेपासून पाऊस सुरू होता. सगळीकडे वाहतूक कोंडी होणार म्हणून ऑफिससाठी लवकर निघाले, कर्वेनगर ते बाणेर इतर वेळेत अर्धा तास लागतो, मात्र आज दीड तास लागला. वर्क फ्रॉम होम सुविधा दिली नसल्याने कामावर हजर राहावे लागले. - वैष्णवी देशमुख (आयटी कर्मचारी)
पाऊस आणि वाहतूक कोंडी समीकरण पुण्यात ठरलेले आहे. ऑफिसला वेळेवर पावसात पोहोचण्यासाठी रावेत ते खराडी प्रवासाला किमान १ ते २ तास आधी घर सोडावं लागतं. मुसळधार पाऊस असताना देखील कंपनीकडून वर्क फ्रॉम सांगितले गेले नाही, त्यामुळे स्वत: मागण्याची वेळ आली. - वैभव बी. (आयटी कर्मचारी)
वाघोली ते विमानगर साधारण २० मिनिटे ते अर्धातास लागतो. आजारी असताना वर्क फ्रॉम होम मागितल्यास कंपनी लगेच देते, मात्र मुसळधार पाऊस सुरू असताना देखील वाहतूक कोंडीत १ तास घालावा लागला आणि ऑफिसला हजर राहावं लागलं. - राणी शिंदे (आयटी कर्मचारी)