डिलिव्हरी बॉय अन् कॅबचालकांना इंधन दरवाढीचा मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 11:18 IST2026-05-17T11:18:30+5:302026-05-17T11:18:43+5:30

- महिन्याचे बजेट कोलमडले; ३० हजार कॅबचालकांना दरमहा सोसावी लागतेय हजार रुपयांची झळ

pune news delivery boys and cab drivers hit hard by fuel price hike | डिलिव्हरी बॉय अन् कॅबचालकांना इंधन दरवाढीचा मोठा फटका

डिलिव्हरी बॉय अन् कॅबचालकांना इंधन दरवाढीचा मोठा फटका

आकाश झगडे

पुणे : इस्रायल, अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावाचा परिणाम आता थेट सर्वसामान्य पुणेकरांच्या खिशावर होताना दिसत आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या असून, देशात शुक्रवारी (१५ मे) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. सीएनजी दोन रुपये आणि पेट्रोल तब्बल तीन रुपयांनी वाढल्याने याचा सेवा क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. 

शहरात दिवस-रात्र राबणारे कॅबचालक, घरपोच सेवा देणारे डिलिव्हरी बॉईज आणि टेम्पोने गल्लोगल्ली फिरून थेट सोसायट्यांपर्यंत भाजीपाला पोहोचवणारे लहान विक्रेते अडचणीत सापडले आहेत. वाहतूक खर्चात भरमसाट वाढ झाल्याने त्यांचे महिन्याचे बजेट कोलमडले असून, वाढत्या महागाईत आम्ही कुटुंबाचा गाडा हाकायचा तरी कसा?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

सीएनजीचे दर भडकल्याने कॅब चालकांचा नफा घटला

शहरात आजच्या घडीला साधारणपणे ३० हजार कॅब चालक रस्त्यांवर धावत आहेत. बहुतांश कॅब या सीएनजीवर चालतात. एका कॅब चालकाला व्यवसायासाठी दिवसाला सरासरी एक पूर्ण टाकी सीएनजी लागतो. त्याचा दैनिक खर्च ८०० रुपये आहे. सीएनजी महाग झाल्यामुळे रोजच्या खर्चात २० ते ३० रुपयांची थेट वाढ झाली आहे. सर्व इंधन खर्च वजा जाता आधी या चालकांचे मासिक उत्पन्न २१ ते २४ हजार रुपयांच्या घरात होते. मात्र, आता त्यात महिन्याला १,००० रुपयांची घट होत असल्याने त्यांच्यापुढे कुटुंबाचा खर्च भागवण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.

डिलिव्हरी बॉईजना उन्हाचा चटका अन् पेट्रोल दरवाढीचा दुहेरी मार

सध्या शहरात उन्हाचा पारा ४० अंशांच्या पार गेल्याने प्रचंड उष्णतेत १२-१२ तास दुचाकीवर फिरणारे डिलिव्हरी बाॅय कामगार आधीच शारीरिक तणावाखाली आहेत. त्यात आता पेट्रोलचे दर तीन रुपयांनी वाढल्याने त्यांच्या आर्थिक अडचणी आणखी वाढल्या आहेत. शहरात सध्या ३० ते ४० हजार डिलिव्हरी बॉईज कार्यरत आहेत. त्यांना दिवसाला तीन ते चार लिटर पेट्रोल लागते. यानुसार ३०० ते ४०० रुपये फक्त पेट्रोलवर खर्च होतात. या रोजच्या इंधन खर्चात थेट २०-३० रुपयांची भर पडली आहे. सर्व खर्च वजा करून या तरुणांचे मासिक उत्पन्न अवघे ९ ते १० हजार रुपये असायचे. आता या पेट्रोल दरवाढीमुळे त्यांच्या खिशाला महिन्याला ६०० ते ८०० रुपयांची कात्री बसणार आहे. याशिवाय एलपीजी व खाद्यतेलाची दरवाढ झाल्यामुळे ऑनलाइन मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दरात वाढ झाली असल्याने ऑर्डरची संख्या घटली आहे.

थेट सोसायट्यांत भाजीपाला पोहोचवणारे फिरते भाजी विक्रेते चिंतेत

या इंधन दरवाढीचा परिणाम केवळ कॅब आणि डिलिव्हरीपुरता मर्यादित नाही. शहरातील गल्लोगल्ली आणि सोसायट्यांमध्ये रोज छोट्या टेम्पोच्या माध्यमातून भाजीपाला, फळे आणि इतर जीवनावश्यक वस्तू विकणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांचा वाहतूक खर्च थेट वाढला आहे. यामुळे बाजारात भाजीपाल्याचे किरकोळ दर वाढण्याची शक्यता असून, याचा अप्रत्यक्ष फटका सामान्य पुणेकर ग्राहकांना बसेल. दुसरीकडे, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे ग्रामीण व निमशहरी भागातील ट्रॅक्टर आणि मळणी यंत्रे चालवण्याचा खर्च वाढणार आहे. ऐन शेतीच्या हंगामात उत्पादन खर्च वाढल्यामुळे शेतकरी वर्गही या दरवाढीत होरपळून निघत आहे. 

दुपारच्या कडक उन्हात आम्ही गल्लोगल्ली फिरतो. पेट्रोल तीन रुपयांनी महाग झाले आहे. परंतु, कंपनीने आम्हाला प्रति ऑर्डर मिळणारे पैसे वाढवून दिलेले नाहीत. या अतिरिक्त खर्चाचा थेट परिणाम आमच्या खिशावर झाला आहे. आधीच १० हजारांत घर चालवणे कठीण होते, आता तर ६०० ते ८०० रुपये कमी येणार असल्याने महिन्याचे गणितच कोलमडले आहे. - स्वप्निल लोंढे, डिलिव्हरी बॉय.

आधीच कंपन्यांचे कमिशन आणि गाड्यांचे हप्ते भरून आमच्या हातात काही उरत नव्हते. आता दररोज ३० रुपये जादा मोजावे लागत आहेत. यामुळे महिन्याला १,००० रुपये कमी मिळणार आहेत. या पैशात आमच्या घरचा किराणा किंवा मुलांच्या शाळांच्या व्हॅनचा खर्च सुटत होता. आता हा अतिरिक्त आर्थिक भार सोसावा लागणार आहे. भाडेवाढ झाली नाही तर आम्ही जगायचे कसे ? - कॅबचालक, पुणे 

सरकारने कंपन्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करून वाढत्या इंधन खर्चाचा संपूर्ण बोजा कामगारांवर पडू नये यासाठी हस्तक्षेप करावा. कंपन्यांनीही इंधनाच्या दर वाढीप्रमाणे डिलिव्हरी बॉईज व कॅबचालकांना त्या प्रमाणात पैसे वाढवून द्यावेत.  - डॉ. केशव क्षीरसागर, अध्यक्ष, भारतीय गिग कामगार मंच.

 

 

Web Title : ईंधन की कीमतों में वृद्धि से डिलीवरी बॉय और कैब ड्राइवर बुरी तरह प्रभावित।

Web Summary : ईंधन की बढ़ती कीमतों के कारण पुणे के कैब ड्राइवर और डिलीवरी बॉय कठिनाइयों का सामना कर रहे हैं। सीएनजी की कीमतों में वृद्धि से कैब ड्राइवर का मुनाफा कम हो गया है, जबकि डिलीवरी बॉय गर्मी के बीच पेट्रोल की बढ़ी हुई लागत से जूझ रहे हैं। सब्जी विक्रेता भी परिवहन लागत बढ़ने से चिंतित हैं।

Web Title : Fuel price hike hits delivery boys and cab drivers hard.

Web Summary : Pune's cab drivers and delivery boys face hardship due to rising fuel prices. CNG price hikes reduce cab driver profits, while delivery boys struggle with increased petrol costs amid heat. Vegetable vendors also worry about rising transport costs.