‘ड्रीम ११’मध्ये टीम लावून चांगला परतावा मिळवण्याच्या आमिषापोटी १४ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 18:18 IST2025-08-17T18:17:36+5:302025-08-17T18:18:04+5:30
- मूळ रक्कम अथवा कोणताही परतावा न मिळाल्याने महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी हडपसर पोलिस ठाण्यात जात नुकतीच तक्रार दिली.

‘ड्रीम ११’मध्ये टीम लावून चांगला परतावा मिळवण्याच्या आमिषापोटी १४ लाखांची फसवणूक
पुणे : सायबर चोरांकडून दरवेळी वेगवेगळ्या फसवणुकीच्या पद्धतींचा अवलंब करत सर्वसामान्यांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. अशाच एका घटनेत मांजरी येथील ३२ वर्षीय महिलेला सायबर चोरांनी ‘ड्रीम ११’मध्ये टीम लावून त्याद्वारे चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले.
८ मे ते ६ जूनदरम्यान महिलेने १४ लाख २२ हजार ३६६ रुपये चांगल्या परताव्याच्या आमिषापोटी ऑनलाइन वर्ग केले. त्यानंतर मूळ रक्कम अथवा कोणताही परतावा न मिळाल्याने महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी हडपसर पोलिस ठाण्यात जात नुकतीच तक्रार दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक नीलेश जगदाळे करत आहेत.
गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची फसवणूक..
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने बिबवेवाडी भागातील एका ज्येष्ठ महिलेची दहा लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एका महिलेने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला बिबवेवाडीत राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर मेसेज पाठवला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी त्यांना जाळ्यात ओढले.
चोरट्यांनी महिलेला बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. महिलेने दहा लाख रुपये जमा केले. सुरुवातीला महिलेला चोरट्यांनी परतावा दिला. त्यानंतर परतावा, तसेच मूळ रक्कम दिली नाही. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बेंद्रे पुढील तपास करत आहेत.