कोरेगावातील इतिहास हा जातीपातीच्या विरोधातील लढा : प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 18:48 IST2026-01-01T18:46:30+5:302026-01-01T18:48:30+5:30
आमच्याकडून पक्षाच्या बाहेरील उमेदवारांना संधी देण्यात आलेली नाही आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच उमेदवारी देण्यात येणार आहे

कोरेगावातील इतिहास हा जातीपातीच्या विरोधातील लढा : प्रकाश आंबेडकर
कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी शासनाकडून नागरिकांसाठी चांगली व्यवस्था करण्यात आली असून कोरेगावातील इतिहास हा मानवतेचा इतिहास आहे. येथील जातीपातीच्या विरोधातील लढ्यामुळे नव्या विचारसरणीची सुरुवात झाली आणि भारताच्या परिवर्तनाची सुरुवात झाली असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
कोरेगाव भीमा, ता. शिरूर येथे एक जानेवारी रोजी शौर्यदिनी अभिवादन करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. यावेळी बोलताना, शासनाने येथे केलेल्या सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
अनुयायांना ने-आण करण्याची व्यवस्था उत्तम असून, पालिका निवडणुकीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, आमच्याकडून पक्षाच्या बाहेरील उमेदवारांना संधी देण्यात आलेली नाही आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच उमेदवारी देण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेतील जागावाटपाबाबत काँग्रेसने आम्हाला जास्त जागा दिल्या, ज्या ठिकाणी काँग्रेसकडे सक्षम उमेदवार होते त्या जागा त्यांनी ठेवून दिल्या व ज्या ठिकाणी आमच्याकडे मजबूत उमेदवार होते त्या जागा आम्ही घेतल्या नाहीत, असेही वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.