पिंपरी : वाकड येथील एका मॉलमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या महिलेवर तिच्या वरिष्ठाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरडा केल्यानंतर संशयिताने कुणाला काही न सांगण्याची धमकी दिली. ही घटना १० सप्टेंबर रोजी घडली.
या प्रकरणी २१ वर्षीय पीडित महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर वाकड पोलिसांनी मनोज कदम (वय ३५) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून १२ सप्टेंबर रोजी त्याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २१ वर्षीय महिला वाकड येथील एका मॉलमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होती. तिच्यासह मॉलमध्ये १० पुरुष आणि तीन महिला सुरक्षारक्षक काम करतात. १० सप्टेंबर रोजी पीडित महिला कामावर गेली. संशयित मनोज हा तेथे वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करीत होता. त्याने सर्व सुरक्षारक्षकांना काम वाटून दिले आणि पीडित महिलेला त्याच्यासोबत घेऊन गेला. त्याने पीडितेला टॉवर क्लबमध्ये पाठविले आणि तिच्यासोबत तोही तिथे गेला.
तिथे आधीच उपस्थित असलेल्या इतर कर्मचाऱ्यांना त्याने बाजूला पाठवले. त्यानंतर संशयिताने पीडितेला बढती आणि पगारवाढीचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. तिने यासाठी नकार दिला असता त्याने तिच्याशी असभ्य वर्तन केले. महिलेने कदम याला मारहाण करून आरडाओरडा करून विरोध केला. मात्र, इथे कोणीही येणार नसल्याचे सांगत त्याने महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. घडल्या प्रकारानंतर महिला खाली आली असता सुपरवायझरने तिच्याकडे विचारणा केली. महिलेने घडलेला प्रसंग सुपरवायझरला सांगून पतीला बोलावून घेतले.
या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी संशयित कदम याला अटक केली. त्याला हृदयविकाराचा त्रास असल्याने त्याला थेरगाव येथील रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत असून, उपचारानंतर त्याच्या पोलिस कोठडीची मागणी केली जाणार आहे. पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड, सहायक आयुक्त सुनील कुराडे, वरिष्ठ निरीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नीता गायकवाड तपास करीत आहेत.