गतवर्षीच्या तुलनेत आवक २० ते ३० टक्क्यांनी कमी; ऐन दसऱ्यात शेतकऱ्यांचे नुकसान; दर्जा खालावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 14:31 IST2025-10-02T14:29:39+5:302025-10-02T14:31:00+5:30
पावसामुळे फुले ओली झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, भावही कोसळले आहेत. बुधवारी रात्री बारापासून फुलांच्या विक्रीला सुरुवात झाली.

गतवर्षीच्या तुलनेत आवक २० ते ३० टक्क्यांनी कमी; ऐन दसऱ्यात शेतकऱ्यांचे नुकसान; दर्जा खालावला
पिंपरी : सततच्या पावसामुळे पिंपरी फूल बाजाराला मोठा फटका बसला आहे. गतवर्षीच्या तुलनेत झेंडूच्या फुलांची आवक २० ते ३० टक्क्यांनी कमी झाली. पावसामुळे फुले ओली झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, भावही कोसळले आहेत. बुधवारी रात्री बारापासून फुलांच्या विक्रीला सुरुवात झाली.
मावळ, मुळशी, खेड, मंचर, जुन्नर, सिन्नर, हिंगोली, जालना, संभाजीनगर आदी भागातील शेतकरी पिंपरी फूल बाजारात विविध प्रकारची फुले विक्रीसाठी घेऊन आले होते. मात्र, पावसामुळे फुलांचा दर्जा खालावला असून, आवकही लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.
फुलांचे दर (प्रतिकिलो)
झेंडू गोंडा : ४० ते १२० रुपये
कलकत्ता झेंडू : १२० ते १५० रुपये
अष्टगंध झेंडू : ८० ते १०० रुपये
पिवळा झेंडू : १०० ते १२० रुपये
शेवंती : २०० ते ३०० रुपये
गुलाब (तुकडा) : ४०० ते ५०० रुपये
गुलाब गड्डी : १५० ते २०० रुपये
अष्टर : १५० ते २०० रुपये
कापरी : १२० ते १५० रुपये
गुलछडी : ८०० ते १००० रुपये
झेंडूची आवक किती?
मंगळवारी (दि. ३०) आणि बुधवारी (दि. १) फूल बाजारात झेंडू ४५० ते ५०० क्विंटल, तर शेवंती १०० क्विंटल आवक नोंदवली. इतर फुलांची आवक कमी प्रमाणात झाली.
ओली झेंडू अवघे १० रुपये किलो
पावसामुळे पूर्णपणे ओल्या झालेल्या झेंडू फुलांना अवघ्या १० रुपये प्रतिकिलो दर मिळाला. त्यामुळे शेतकरीवर्ग निराश आहे.
झेंडूची रस्त्यावर विक्री
दसऱ्याच्या पूर्वसंध्येपासून शहरातील विविध रस्त्यांवर फुलांची विक्री जोरात सुरू आहे. विशेषतः पिंपरीतील शगुन चौक, भोसरी, चिंचवड, आकुर्डी परिसरात झेंडूचे ढीग विक्रीसाठी दिसून आले. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेते मोठमोठ्या आवाजात फुलांचे दर सांगताना दिसून आले.
झेंडूच्या या आहेत जाती
गोंडा झेंडू जातीची फुले मोठ्या आकाराची असतात, ती प्रामुख्याने सजावटीसाठी वापरतात. कलकत्ता झेंडू रंगीत आणि आकर्षक, माळांसाठी लोकप्रिय आहे. अष्टगंध झेंडू सुगंधी आणि लहान आकाराची फुले पूजेसाठी वापरतात. पिवळा झेंडू चमकदार पिवळ्या रंगामुळे उत्सवात विशेष मागणी असते. झेंडूची लागवड साधारणपणे खरीप हंगामात होते. चांगल्या निचऱ्याची जमीन आणि नियमित पाणीपुरवठा आवश्यक आहे. उत्पादन महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात होते.
दसरा सणामुळे मागणी वाढली आहे, पण पावसामुळे फुलांची आवक २० ते ३० टक्के कमी आहे. ग्राहक चांगल्या दर्जाच्या फुलांची मागणी करतात; पण ओल्या फुलांना कमी भाव मिळाला. - दत्ता ठाकर, फूल विक्रेते
पावसामुळे फुलांचा दर्जा खालावला असून, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. बाजारात मागणी असूनही पुरवठ्याची कमतरता आणि कमी दर्जामुळे भाव कोसळले आहेत.- ज्ञानेश्वर केमसे, अध्यक्ष, पिंपरी फूल बाजार