जेजुरी : पुरंदर तालुक्यातील बेलसर टोल नाक्यावरून पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली असून, अपूर्ण कामांवर टोलवसुली सुरू केल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संपूर्ण पुरंदर तालुक्याला टोलमधून वगळावे, अशी ठाम मागणी करत आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
सासवड येथील नवीन प्रशासकीय इमारतीत झालेल्या बैठकीत नागरिक, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी राम लठाड यांच्या उपस्थितीत नागरिकांनी प्रलंबित कामांचा पाढा वाचत प्रशासनाला धारेवर धरले. रस्ता केवळ ७० टक्के पूर्ण असताना टोल वसुली सुरू करण्यात आल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी ती तात्काळ थांबवण्याची मागणी केली.
शासनाच्या नियमांनुसार किमान ७५ टक्के काम पूर्ण झाल्यानंतरच टोल आकारणी करता येते, असा मुद्दा आंदोलकांनी ठामपणे मांडला. तसेच रस्त्यावरील अनेक त्रुटींचाही पाढा वाचण्यात आला. दुभाजकांवर अद्याप प्रकाशयोजना नसल्याने रात्रीचा प्रवास धोकादायक होत असल्याचे सांगण्यात आले. वाल्हे परिसरात अपेक्षित ४५ मीटरऐवजी केवळ ३० मीटर रुंदीचा रस्ता करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली.
नीरा परिसरातील नागरिकांना महामार्गावर येण्यासाठी असुविधाजनक वळणे देण्यात आली असून, अनेक ठिकाणी अपघातप्रवण स्थिती निर्माण झाली आहे. तक्रारवाडी फाट्याजवळील टोलप्लाझाही सदोष असल्याचे नागरिकांनी नमूद केले. जेजुरीच्या यात्रा व सुटीच्या काळात येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. दिवेघाटासह अनेक ठिकाणी कामे अपूर्ण असतानाही टोल वसुली सुरू असल्याने नाराजी वाढली आहे.
पुरंदर पंचायत समितीचे सभापती अमित झेंडे यांनी स्पष्ट भूमिका घेत सांगितले की, “राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा होऊन ठोस तोडगा निघेपर्यंत पुरंदर तालुक्यातील नागरिकांकडून टोल वसुली थांबवावी.” स्थानिकांना आधार कार्डच्या आधारे सवलत देण्याची मागणीही त्यांनी केली. त्यांच्या या भूमिकेला उपस्थितांचा जोरदार पाठिंबा मिळाला.
नागरिकांनी टोल कंपनीच्या कामकाजावरही गंभीर आरोप केले. टोल कर्मचाऱ्यांकडून वाहन चालकांशी उद्धट वर्तन, विनाकारण अडवणे आणि दबाव टाकण्याच्या तक्रारी बैठकीत मांडण्यात आल्या. या बैठकीला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी सभापती अतुल म्हस्के, शिवसेनेचे दादा थोपटे, धीरज जगताप, मनसेचे तालुकाध्यक्ष उमेश जगताप, जेजुरी शहराध्यक्ष गणेश कुंभार, दादा फाउंडेशनचे यशवंत दोडके, शिवराज झगडे, नितीन राऊत, राष्ट्रवादीचे रमेश लेंडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपली भूमिका मांडली. वाल्हे, खळद, साकुर्डे, जेजुरी, नीरा, पिंगोरी, बेलसर, निळुंज, वाळुंज, नावळी, दौडज, गुळुंचे येथील नागरिक व आजी-माजी लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत एकमुखाने ठराव मांडत अपूर्ण कामांवर टोल आकारणी तत्काळ बंद करावी, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा होईपर्यंत पुरंदरवासीयांनी टोल देऊ नये आणि आधार कार्ड दाखवून पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. एकूणच, बेलसर टोल नाका पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला असून, प्रशासन आणि नागरिकांमधील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. पुढील बैठकीत यावर तोडगा निघतो का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.