By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 16:50 IST
1 / 15Mumbai Pune Expressway Missing Link: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मुंबई आणि पुण्यादरम्यानचे अंतर कमी करण्यासाठी व प्रवासवेळ अर्ध्या तासाने कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. ०१ मे २०२६ रोजी ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’वरील या विशेष मार्गिकेचे लोकार्पण केले जाणार आहे. ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’वरील ही मार्गिकेची वैशिष्ट्ये अतिशय खास असल्याचे सांगितले जात आहे.2 / 15How Did The Name Missing Link: ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे काम ऑगस्ट २०१८ मध्ये सुरू झाले. हा मार्ग सुरू झाल्यावर लोणावळा घाटातील कोंडीतून प्रवाशांची कायमची सुटका होणार आहे. अनेक अडथळे, भौगोलिक परिस्थिती अशा कारणांमुळे हा प्रकल्प पूर्ण करणे आव्हानात्मक ठरले. ६,६९५.३७ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे प्रवासाच्या वेळेत ३० मिनिटांची बचत होणार आहे.3 / 15Mumbai Pune Expressway Missing Link Special Route And Special Features: कामगारांसाठी ऑक्सिजन पुरवठा, विविध प्रकारच्या खडकांचे परीक्षण व योग्य उपाययोजना, त्याचे भुयारीकरण करताना ब्लास्टिंग, डोंगराळ भागातील तीव्र चढउतार, खंडाळ्यातील घनदाट जंगल व मुसळधार पाऊस, उंचीवर काम करताना वाऱ्याचा दाब, केबल स्टेड पुलापर्यंत पोहोचण्यासाठी जंगलातून पोहोच मार्ग बांधकाम, अशी अनेक आव्हाने पार करण्यात आली.4 / 15‘मिसिंग लिंक’ मार्गिकेवरील पुलासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे डिझाइन परदेशातून आणावे लागले. पुलाच्या वादळ, टेन्सिल, स्टे केबल्स चाचण्या, तसेच धातू किंवा संरचनेची वारंवार ताणतणाव सहन करण्याची क्षमता तपासणाऱ्या चाचण्या परदेशात करण्यात आल्या. तर, बोगद्याच्या भिंतीला ५ मीटरचे आवरण करण्यात आले असून त्यावर आगप्रतिबंधक लेपन करण्यात आले आहे. आग लागल्यास ती विझवण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणाही सज्ज करण्यात आली आहे.5 / 15वॉटर मिस्ट अग्निशमन यंत्रणा, स्काडा प्रणाली, आधुनिक वाहतूक नियंत्रण यात व्हीएमएस, व्हीएसएलएस, एलसीएस प्रणालीचा वापर, एसओएस व आपत्कालीन सुविधा, एएनपीआर कॅमेरे, लिनिअर हीट डिटेक्शन सिस्टम, व्हाइस ईव्हॅक्युएशन सिस्टम, व्हेंटिलेशन सिस्टम, असे विशेष तंत्रज्ञान ‘मिसिंग लिंक’ मार्गिकेसाठी वापरण्यात आले आहे. 6 / 15‘मिसिंग लिंक’ विशेष मार्गिकेवरील बोगदा क्रमांक १ - १.६४ किमी लांबी, २३.५० मीटर रुंदी, बोगदा क्रमांक २ - ८.९२ किमी लांबी, २३.५० मीटर रुंदी आहे. तसेच पूल क्रमांक १- ९०० मीटर लांबी, ६० मीटर उंची आहे. तर, केबल स्टेड ब्रिज - ६५० मीटर लांबी, १८४ मीटर उंची आहे.7 / 15लोणावळा तलावाच्या तळाखाली जवळपास ५०० ते ६०० फूट अंतरावरून हा बोगदा जात आहे. जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या बोगद्याचे काम करण्यात आले आहे. प्रवासी, वाहने यांच्या सुरक्षेचा बारीक विचार करून हा बोगदा बांधण्यात आला आहे. आपत्कालीन परिस्थितीत बाहेर जाण्यासाठी प्रत्येक ३०० मीटरवर मार्ग तयार करण्यात आले आहेत.8 / 15जगातील सर्वांत रुंद २३.५ मीटरचा बोगदा, आशियातील सर्वाधिक उंचीचा पूल. उंची १८४ मीटर, पुलाची वाऱ्याचा वेग सहन करण्याच्या क्षमतेची 'विंड टनेल टेस्ट' डेन्मार्कमधील कोपेनहेगन येथे केली. केबल स्टेड पुलाची वाऱ्याचा वेग सहन करण्याची क्षमता २५२ किमी प्रतितास आहे. केबल स्टेड पुलाचा स्पॅन ३०५ मीटर लांबीचा, पुलाच्या पाहणीसाठी प्रथमच कायमस्वरूपी हेल्थ मॉनिटरिंग सिस्टीम उभारण्यात येणार आहे.9 / 15प्रवाशांसाठी सुरक्षित प्रवास व वेळेची बचत, घाटातील तीव्र वळणे टाळल्यामुळे अंतर कमी होणार, अखंड वाहतूक प्रवाह, पथकर नाक्याच्या विस्तारामुळे वाहतूक कोंडी टाळणे शक्य, दररोज सुमारे १ कोटी रुपयांच्या इंधनाची बचत अपेक्षित, अपघातात घट होणार असून, यामुळे मुंबई-लोणावळा/पुणे प्रवास सुलभ होणार आहे.10 / 15‘मिसिंग लिंक’ म्हणजे नेमके काय? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’वरील कुसगाव ते खोपोली मार्गिकेला ‘मिसिंग लिंक’ला नाव कसे पडले, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या अनुषंगाने ‘मिसिंग लिंक’ म्हणजे दोन महत्त्वाच्या रस्त्यांना किंवा महामार्गांना जोडणारा भाग, जो अपूर्ण अवस्थेत असतो. पुढे तो अपूर्ण भाग जोडला जातो, त्यावेळी त्याला ‘मिसिंग लिंक’ म्हणून संबोधले जाते. 11 / 15मुंबई – पुणे द्रुतगती महामार्ग आताच्या घडीला राज्यातील सर्वाधिक वर्दळीचा महामार्ग ठरला आहे. वाहनांची संख्या प्रचंड वाढल्याने आता हा महामार्ग वाढत्या वाहनसंख्येला सामावून घेण्यासाठी अपुरा पडत आहे. महामार्गाची क्षमता वाढविण्यासह प्रवास अतिजलद, सुरक्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने खोपोली – कुसगाव दरम्यान मार्गिका बांधण्याचा निर्णय घेतला. महामार्गाला जोडणारा हा अपूर्ण भाग असल्याने ही मार्गिका ‘मिसिंग लिंक’ ठरली. पुढे या प्रकल्पाचे नावच ‘मिसिंग लिंक’ झाले.12 / 15या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती, त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, तर आता त्यांच्या उपस्थितीतच या प्रकल्पाचे लोकार्पण होणार असल्याने हा एक विशेष योगायोग असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचे अंतर सुमारे ६ किलोमीटरने कमी होणार आहे. 13 / 15‘मिसिंग लिंक’ सुरू झाल्यानंतर घाटातील धोकादायक वळणे आणि वाहतूक पूर्णपणे बायपास होणार असून प्रवासाचा वेळ सुमारे २० ते ३० मिनिटांनी कमी होईल. ‘मिसिंग लिंक’वर मालवाहू वाहनांना प्रवेश नाही. केवळ हलकी मोटार वाहने (LMV) व बसेस / प्रवासी वाहने यांनाच प्रवेश देण्यात येत आहे. सुरूवातीच्या सहा महिन्यांच्या निरीक्षणानंतर मालवाहू वाहनांना परवानगी देण्याबाबत निर्णय घेतला जाईल.14 / 15धोकादायक माल - ज्वलनशील, स्फोटक किंवा धोकादायक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ या मार्गावर पूर्णतः बंदी असेल. ‘मिसिंग लिंक’ विशेष मार्गिकेवरील वेगमर्यादा हलक्या वाहनांसाठी ताशी १०० किमी प्रति तास निश्चित करण्यात येत आहे. तसेच बस व प्रवासी वाहनांसाठी ताशी ८० किमी प्रति तास करण्यात येत आहे.15 / 15‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे मुंबई आणि पुणे यांच्यातील प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. या प्रकल्पामुळे लोहगड, विसापूर किल्ले आणि कार्ला लेणी यांसारख्या पर्यटन स्थळांना अधिक चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार असून पर्यटनालाही चालना मिळेल, असे म्हटले जात आहे.