ST Bus: प्रवाशांनो इकडे लक्ष द्या..! दिवाळीसाठी पुण्यातून यंदा ५८९ विशेष बसची व्यवस्था
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 13:21 IST2025-10-08T13:19:49+5:302025-10-08T13:21:25+5:30
Pune Extra ST Buses for Diwali 2025: सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, कोकण या भागात जाणाऱ्या गाड्या स्वारगेट येथून सुटतील. तर, शिवाजीनगर येथून ८० जादा बस सोडण्यात येणार आहेत.

ST Bus: प्रवाशांनो इकडे लक्ष द्या..! दिवाळीसाठी पुण्यातून यंदा ५८९ विशेष बसची व्यवस्था
पुणे : दिवाळीनिमित्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागातून प्रवाशांच्या सोयीसाठी यंदा ५८९ विशेष बसची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व जादा बस दि. १५ ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर या कालावधीत सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची गावी जाण्याची व्यवस्था होणार आहे.
नोकरी, शिक्षण व व्यवसायानिमित्त राज्य आणि राज्याबाहेरील पुण्यात राहणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. दिवाळीसाठी हे नागरिक गावी जातात. सध्या रेल्वेचे बुकिंग फुल्ल झाले आहे. त्यामुळे नागरिकांना एसटीशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे दिवाळीच्या काळात एसटीला कायम गर्दी असते. खास करून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील नागरिक मोठ्या संख्येने गावी जातात. त्यासाठी एसटीकडून जादा बसची सोय केली जाते. यंदा दिवाळीच्या काळात नियमित बस व्यतिरिक्त जादा बस सोडण्यात येणार आहेत. जादा बसचे ऑनलाइन बुकिंग सुरू झाले आहे. नागरिक एसटी महामंडळाच्या संकेतस्थळ अथवा मोबाईल ॲपवरून तिकीट बुकिंग करू शकतात. तसेच, एसटीच्या अधिकृत तिकीट बुकिंग केंद्रावर तिकीट आरक्षण सुरू झाले आहे.
मराठवाडा, विदर्भासाठी ३९६ जादा बस :
मागील काही वर्षे दिवाळीच्या काळात खडकी कँन्टोमेंट येथून मराठवाडा, विदर्भासाठी जादा बस सोडण्यात येत होत्या. पण, यंदा खडकीची जागा योग्य नसल्यामुळे एसटी महामंडळाकडून नवीन जागेचा शोध घेतला जात होता. वाकडेवाडी बसस्थानकासमोर आरेची जागा देण्याची मागणी एसटीकडून करण्यात आली होती. पण, ही जागा पीएमआरडीएच्या ताब्यात असल्याने त्यांनी ही जागा देण्यास नकार दिला. त्यामुळे शेवटी एसटी महामंडळाने पिंपरी-चिंचवड आगारातून जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला.
स्वारगेट येथून ११३ जागा बस :
पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी स्वारगेट एसटी बसस्थानक येथून नियमित बसबरोबरच ११३ जादा बस सोडण्यात येणार आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, कोकण या भागात जाणाऱ्या गाड्या स्वारगेट येथून सुटतील. तर, शिवाजीनगर येथून ८० जादा बस सोडण्यात येणार आहेत. यावेळी दररोज धावणाऱ्या निमयित गाड्या सुरू असणार आहेत. स्थानकावर गर्दी होऊ नये म्हणून महामंडळाकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे.
बसस्थानक ----- बस संख्या
शिवाजीनगर----- ८०
स्वारगेट---- १२२
पिंपरी-चिंचवड --- ३९६
एकूण ----- ५८९
दिवाळीसाठी एसटी महामंडळाच्या पुणे विभागाकडून १५ ऑक्टोबरपासून जादा बस सोडण्यात येणार आहेत. याशिवाय नियमित बसदेखील सुरू असणार आहेत. दिवाळीच्या काळात तिकिटामध्ये वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे खासगी बसने जादा तिकीट देऊन प्रवास करणे टाळावे. प्रवाशांनी एसटीला प्राधान्य द्यावे. - अरुण सिया, विभाग नियंत्रक, पुणे एसटी विभाग.