जेजुरीत मर्दानी दसऱ्याचा १८ तासांचा धमाल उत्सव; हजारो भाविकांच्या जल्लोषात पालखी सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 19:28 IST2025-10-03T19:27:14+5:302025-10-03T19:28:58+5:30
खंडा कसरत स्पर्धेत रमेश शेरे प्रथम : ४० किलोचा खंडा १३ मिनिटांहून जास्त तोलला

जेजुरीत मर्दानी दसऱ्याचा १८ तासांचा धमाल उत्सव; हजारो भाविकांच्या जल्लोषात पालखी सोहळा
जेजुरी : नवरात्रीच्या सांगतेवर जेजुरीच्या तीर्थक्षेत्रात मर्दानी दसऱ्याचा ऐतिहासिक उत्सव अत्यंत धार्मिक, सांस्कृतिक आणि जल्लोषात साजरा झाला. तब्बल १८ तास रंगलेल्या या सोहळ्याने हजारो भाविकांना वीरश्रीची अनुभूती देऊन गेली. पालखी सोहळा, भंडाऱ्याची उधळण, दारूका, फटाक्यांची आतशबाजी आणि डोंगराळ भागातील चढ-उतार यामुळे हा उत्सव अविस्मरणीय ठरला.
नवरात्र संपताच घराघरांतून घट उठल्यानंतर जेजुरी गड आणि परिसर भाविकांनी गर्दीने फुलला. सायंकाळी ६ वाजता पेशव्यांच्या इशारतीने सोहळ्याला सुरुवात झाली. भंडाऱ्याच्या उधळणीत खांदेकरी-मानकऱ्यांनी देवाच्या उत्सवमूर्तीची पालखी उचलली. जयघोषात पालखीने गडकोटातील मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालत बालदारीकडे मार्गक्रमण केली. भंडारगृहातून सेवेकऱ्यांनी उत्सवमूर्ती पालखीत ठेवल्या आणि बंदुकीच्या फैरींच्या सलामीत सीमोल्लंघनासाठी कूच केले. भाविकांच्या मुक्त हस्ताने उधळलेल्या भंडाऱ्यामुळे गडकोटाला सुवर्णनगरीचे स्वरूप आले. मुख्य प्रवेशद्वारातून सोहळा गडाबाहेर पडून प्रदक्षिणा घालत रमण्यमार्गे निघाला आणि गडाच्या पाठीमागील बाजूला विसावला. रात्री ७:३० वाजता टेकडीवर आणि डोंगर उतारावर महिलांपासून आबालवृद्धांपर्यंत मोठी गर्दी जमली होती.
दरम्यान, रात्री ९ वाजता मार्तंड भैरवाच्या कडेपठार मंदिरातील उत्सवमूर्तींचा पालखी सोहळाही सीमोल्लंघनासाठी निघाला. जयाद्रीच्या डोंगररांगेमुळे दोन्ही मंदिरांमध्ये विजेच्या तात्पुरत्या खांब आणि उजेडाची मनमोहक सोय केली होती. विविधरंगी शोभेच्या दारूका, फटाक्यांची आतशबाजी यामुळे सोहळ्याला ऐतिहासिक रंग चढला. जेजुरी गडाची पालखी डोंगर उतारावरून दरीत उतरत होती, तर कडेपठारची पालखी सुसरटिंगीच्या टेकडीवर चढत होती. पूर्णपणे डोंगराळ भागात खांदेकऱ्यांना पालखी सांभाळण्यासाठी कसरत करावी लागली; पण उत्सवाचा जल्लोष आणि फटाक्यांच्या आतशबाजीमुळे सर्वकाही सहजगत्या चालले. रात्रीच्या वेळी हा मर्दानी सोहळा भाविकांना वेगळीच अनुभूती देत होता. पहाटे २ वाजण्याच्या सुमारास दोन्ही पालख्या दरीत भेटून 'देव भेट' सोहळा उरकला. आपटा पूजनानंतर जुन्या जेजुरी मार्गे सोहळ्याने माघारी वळले. ग्रामप्रदक्षिणेनंतर सकाळी ७ वाजता गडावर पोहोचून रोजमुरा वाटपासह सोहळ्याची सांगता झाली.
खंडा कसरत स्पर्धेत रमेश शेरे प्रथम : ४० किलोचा खंडा १३ मिनिटांहून जास्त तोलला
दसऱ्याच्या उत्सवात युवा वर्गाचा लोकप्रिय सोहळा म्हणून खंडा कसरत स्पर्धा रंगली. सुमारे ४० किलोचा खंडा जास्तीत जास्त वेळ पेलून धरणे आणि कसरत करणे या स्पर्धेत ६१ स्पर्धक सहभागी झाले. खंडा तोलण्याच्या स्पर्धेत रमेश शेरे याने १३ मि. २८ सेकंद वेळ तोलून प्रथम क्रमांक मिळवला. अंकुश गोडसे (१३ मि. २६ से.) दुसऱ्या आणि हेमंत माने (८ मि. ४३ से.) तिसऱ्या क्रमांकावर राहिले.