पुणे-नागपूर ‘वंदे भारत’ला प्रवाशांची पसंती; पाच हजार प्रवाशांना लाभ, ६७ लाखांचे रेल्वेला उत्पन्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 17:17 IST2025-08-22T17:17:38+5:302025-08-22T17:17:52+5:30
नुकतेच नागपूर विभागातून पुणे शहरासाठी वंदे भारत एक्स्प्रेस (दि. १०) ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आली. तिकीट दर जास्त असले तरी रेल्वे गाड्यांची संख्या कमी असल्यामुळे ‘वंदे भारत’ला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत

पुणे-नागपूर ‘वंदे भारत’ला प्रवाशांची पसंती; पाच हजार प्रवाशांना लाभ, ६७ लाखांचे रेल्वेला उत्पन्न
पुणे : गेल्या दहा दिवसांपूर्वी पुणे-नागपूर दरम्यान ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. १२ तासांत प्रवास पूर्ण होत असल्याने प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, बुधवार (दि. २०) पर्यंत आठ फेऱ्या झाल्या आहेत. यातून ४ हजार ९६५ प्रवाशांनी प्रवास केला असून, रेल्वेला ६७ लाख ९८ हजार ४४ इतके उत्पन्न मिळाले आहे.
पुण्यात विदर्भ आणि खान्देशात राहणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. परंतु या भागात जाण्यासाठी नागरिकांना सार्वजनिक वाहनांची सोय नाही. असेल तर सुरक्षित प्रवासाची गॅरंटी नाही. त्यामुळे नागपूरकडे जाणाऱ्या सर्व रेल्वेला कायम गर्दी असते. नुकतेच नागपूर विभागातून पुणे शहरासाठी वंदे भारत एक्स्प्रेस (दि. १०) ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आली. तिकीट दर जास्त असले तरी रेल्वे गाड्यांची संख्या कमी असल्यामुळे ‘वंदे भारत’ला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या गाडीला आठ डबे आहेत. यातून एकावेळी ६२० प्रवशांची क्षमता आहे. दररोज ही गाडी पुण्यातून शंभर टक्के भरून जात आहे. गेल्या आठ दिवसांत जवळपास ५ हजार नागरिकांनी यातून प्रवास केला आहे. यामुळे रेल्वे आणि प्रवासी या दोघांचा फायदा होत आहे.
डबे वाढण्याची शक्यता :
पुढील काही दिवसांत दसरा, दिवाळी सण येणार आहेत. दरम्यानच्या काळात रेल्वेला प्रचंड गर्दी असते. अनेक वेळा तिकीट न मिळाल्याने प्रवासी उभे राहून प्रवास करतात. सध्या वंदे भारतला प्रवाशांची वाढती गर्दी पाहता भविष्यात डबे वाढविण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अशी आहे आकडेवारी :
एकूण फेऱ्या -- ०८
एकूण प्रवासी -- ४९६५
एकूण उत्पन्न -- ६७,९८,०४४
वंदे भारत एक्स्प्रेसला सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुण्यातून ही गाडी दररोज भरून जात आहे. - हेमंत कुमार बेहेरा, जनसंपर्क अधिकारी