Pune: रक्षाबंधनाला तुझा भाऊ आला तर जीवे मारू; नवऱ्याची धमकी, विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 12:25 IST2025-08-10T12:23:51+5:302025-08-10T12:25:08+5:30
लग्नाला अवघे १ वर्ष होत असताना सासरकडून कंपनी चालविण्यासाठी २० लाख रुपये आणण्याच्या कारणावरून विवाहितेला त्रास दिला जात होता

Pune: रक्षाबंधनाला तुझा भाऊ आला तर जीवे मारू; नवऱ्याची धमकी, विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
पुणे : पुण्याच्या आंबेगाव बुद्रुक येथे धक्कादायक घटना घडली आहे. रक्षाबंधनाला तुझा भाऊ आला तर जीवे मारू अशी नवऱ्याने रक्षाबंधनाच्या दिवशी धमकी देताच अवघ्या काही तासात 27 वर्षीय उच्चशिक्षित तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. याप्रकरणी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासरच्या ने मानसिक शारीरिक छळ करून वारंवार पैशाची मागणी केल्याचा आरोप देखील विवाहित तरुणीच्या नातेवाईकांचा केला आहे. स्नेहा विशाल झेंडगे असं आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तिचे वडील कैलास मच्छिंद्र सावंत (वय ५५, रा. कर्देहळी, जि. सोलापूर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
लग्नाला अवघा एक वर्ष होत असताना सासरकडून कंपनी चालविण्यासाठी २० लाख रुपये आणण्याच्या कारणावरून सातत्याने होणारा मानसिक आणि शारीरिक छळ सहन न झाल्याने विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पती, सासरे, सासू, दीर, ननंद यांच्यासह सात जणांविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत पती विशाल झेंडगे, सासरे संजय झेंडगे, सासू विठाबाई झेंडगे, दीर विनायक झेंडगे, ननंद तेजश्री थिटे आणि इतर दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहा आणि विशाल यांचा विवाह २ मे २०२४ रोजी झाला होता. विवाहानंतर काही दिवसांतच सासरकडील मंडळींनी कंपनी चालविण्यासाठी माहेरून २० लाख रुपये आणण्याचा तगादा लावण्यास सुरुवात केली. या पैशासाठी स्नेहाला वारंवार शिवीगाळ, मारहाण आणि मानसिक छळ सहन करावा लागत होता. स्नेहाने यापूर्वीही या छळाविरोधात पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र आरोपी संजय झेंडगे यांचा साडू भाऊसाहेब कोल्हाळ याने तिला दमदाटी करून तक्रार मागे घेण्यास भाग पाडले होते. तक्रार मागे घेतल्यानंतरही छळ सुरूच राहिला.
शेवटी हा छळ असह्य झाल्याने ९ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ११ वाजता स्नेहाने आंबेगाव बुद्रुक येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०८, ८५, ११५ (२), ३५२, ३५१ (२)(३), ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविला असून पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.