Pune: मला पतीच पसंत नाही, लग्नाच्या तिसऱ्या दिवशी पत्नीने नाकारले, पतीला जबरदस्त धक्का बसला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 18:25 IST2026-02-07T18:23:26+5:302026-02-07T18:25:21+5:30
निव्वळ आई-वडिलांच्या दबावापोटी लग्न केल्याचे तिने लग्नानंतर तिसऱ्या दिवशी सांगून टाकले, पतीला त्याचा जबरदस्त धक्का बसला.

Pune: मला पतीच पसंत नाही, लग्नाच्या तिसऱ्या दिवशी पत्नीने नाकारले, पतीला जबरदस्त धक्का बसला
पुणे: दोघांचे वाजतगाजत देवाब्राह्मणांच्या साक्षीने दिमाखात लग्न झाले. पतीने लग्नानंतर शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. पण पत्नीने अचानक मला लग्नच मान्य नसून, नवरा पसंत नसल्याचा पवित्रा घेतला. निव्वळ आई-वडिलांच्या दबावापोटी लग्न केल्याचे तिने लग्नानंतर तिसऱ्या दिवशी सांगून टाकले. पतीला त्याचा जबरदस्त धक्का बसला. मानसिक धक्क्यातून सावरत पतीने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. अवघ्या ७ महिने १६ दिवसांच्या संघर्षानंतर दावा निकाली निघाला.
न्यायालयाने त्यांचे लग्न रद्द केले. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश बी. डी. कदम यांनी हा आदेश दिला. राकेश (वय २७) आणि स्मिता (वय २४) (दोघांची नावे बदलली आहेत) असे दोघे आहेत. तो व्यावसायिक, तर ती गृहिणी. पारंपरिक पद्धतीने पाहणी करून जून २०२४ मध्ये दोघांचा विवाह झाला. लग्नानंतर नवराच पसंत नसल्याचे सांगत तिने पतीला वैवाहिक संबंध प्रस्थापित करण्यास नकार दिला. लग्नाच्या २० दिवसानंतर ती माहेरी गेली, ती परतलीच नाही. पतीने ॲड. राहुल जाधव यांच्यामार्फत मे २०२५ मध्ये न्यायालयात धाव घेतली. मुलीचा विवाह आई-वडिलांच्या मर्जीनुसार झाला आहे. मुलीला मान्य नाही. त्यामुळे तो रद्द करून देण्याची मागणी न्यायालयात केली. त्यानुसार न्यायालयाने लग्न रद्द केले.
कधी करता येतो, लग्न रद्द करण्यासाठी अर्ज
लग्न करताना त्यात कोणते विधी झाले पाहिजेत, तसेच त्यातील कोणत्या पारंपरिक बाबी पाळल्या पाहिजेत, तसेच कायदेशीर कोणत्या बाबीची पूर्तता केली पाहिजे, याबाबत हिंदू विवाह कायद्यात काही अटी कलम ५ मध्ये नमूद केलेल्या आहेत. त्या अटींचे पालन न केल्यास लग्न रद्द करण्यासाठी कलम ११ आणि १२ नुसार अर्ज करता येतो. हा अर्ज लग्न झालेल्या तारखेपासून १ वर्षाच्या आत करावा लागतो. अर्ज आल्यानंतर दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून न्यायालय निर्णय देते.