पुण्यातील कचरावेचक महिलेच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! १० लाखांची बॅग सापडली; मालकाचा शोध घेत परत केली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 16:32 IST2025-11-22T16:32:16+5:302025-11-22T16:32:36+5:30
बॅगेतील एक पैशाला हात न लावता ती बॅग प्रामाणिकपणे संबंधिताला परत केली, त्यावेळी त्या माणसाच्या जीवात जीव आला

पुण्यातील कचरावेचक महिलेच्या प्रामाणिकपणाचे कौतुक! १० लाखांची बॅग सापडली; मालकाचा शोध घेत परत केली
पुणे : पैशाचा मोह कधी कोणाला आवरता येत नाही. साधे १००, ५०० रुपये सापडले तरी गरीब असो वा श्रीमंत ते पटकन उचलतो. पैशाच्या बाबतीत तर प्रामाणिकपणा अजिबातच दिसून येत नाही. त्याउलट आता तर फसवणूक करून पैसे लुटल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पुण्यात तर कोट्यवधींचे बेकायदेशीर व्यवहार समोर आले आहेत. अशातच एका कचरावेचक महिलेच्या प्रामाणिकपणाचे पुणेकरांकडून कौतुक केले जात आहे. या महिलेने कचरा गोळा करताना सापडलेली १० लाखांच्या रकमेची बॅग मालकाला परत केली आहे. अंजू माने असे अभिमानस्पद काम केलेल्या महिलेचे नाव आहे.
पुण्याच्या सदाशिव पेठेत कचरावेचक अंजू माने या रोज ठरलेल्या वेळेप्रमाणे कचरा गोळा करत होत्या. त्यावेळी त्यांना १० लाखांची रोख रक्कम असलेली बॅग सापडली. एवढी मोठी रक्कम बघून त्यांना कसलाही मोह झाला नाही. यावेळी माने यांनी बॅगचा मालक शोधण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तो माणूस त्यांना भेटला. तो प्रचंड अस्वस्थ होता. अंजू माने यांनी त्याला आधी पिण्यासाठी पाणी दिले. मग त्याची पैशाची बॅग समोर ठेवली. त्यांनी बॅगेतील एक पैशाला हात न लावता ती बॅग प्रामाणिकपणे संबंधिताला परत केली. त्यावेळी त्या माणसाच्या जीवात जीव आला. त्याने अंजु यांचे आभारही मानले.
१० लाखांचा मोह अंजू यांना झाला असता तर पुढे त्यांनी ही गोष्ट कोणालाही कळून दिली नसती. त्या पैशाने त्यांचे आयुष्यच बदलून गेले असते. पण त्यांनी कसलाही नकारात्मक विचार न करता बॅगच्या मालकाला शोधण्यास सुरुवात केली. तो भेटल्यावर त्याच टेन्शन दूर करण्यासाठी त्याला पाणी दिले. त्यानंतर त्याची बॅग परत केली. यावरून जगात अजूनही माणुसकी कुठंतरी शिल्लक असल्याचे दिसून येते. अंजु यांनी केलेल्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होऊ लागले आहे.