- अंबादास गवंडी
पुणे :पुणेरेल्वे विभागातील एकूण ९२५ किमी लोहमार्गापैकी ५८८ किमीचे दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. यातील प्रमुख मार्ग असणाऱ्या दौंंड-मनमाड आणि पुणे-मिरज लोहमार्गांचे दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे या दोन्ही मार्गांवर रेल्वेगाड्यांचा वेग वाढला असून, गाड्यांची संख्यादेखील वाढल्या आहेत. याचा फायदा रेल्वे प्रवाशांसह मालवाहतुकीसाठी होत आहे.
मध्य रेल्वे विभागात पुणे विभाग हा महत्त्वाचा विभाग आहे. पुण्यासह दौंड, मिरज, कोल्हापूर, अहिल्यानगर आणि शिर्डी या प्रमुख स्थानके आहेत. यातील पुणे ते दौंड, पुणे ते लोणावळा, दौंड ते मनमाड आणि पुणे ते मिरज या मार्गावर प्रवासी गाड्यासह मालवाहतूक गाड्यांची कायम वर्दळ असते. त्यात या दोन्ही मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाल्यामुळे गाड्यांचा वेग वाढला आहे. यापूर्वी एकाच ट्रॅकवर गाड्या क्रॉसिंगसाठी थांबवाव्या लागत असल्याने विलंब होत होता. मात्र आता दुहेरी मार्ग उपलब्ध झाल्याने गाड्यांना थांबावे लागणार नाही. परिणामी वेळेची बचत होत आहे.
प्रवासी गाड्यांसह मालगाड्यांचीही वाहतूक अधिक सुरळीत आणि जलद होणार आहे. विशेषतः औद्योगिक आणि कृषी मालवाहतुकीसाठी या मार्गांचे मोठे महत्त्व असल्याने या प्रकल्पामुळे अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे. यामुळे केवळ वेळेची बचत होणार नसून, प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा मिळणार आहे. भविष्यात वाढणाऱ्या प्रवासी आणि मालवाहतुकीच्या गरजा लक्षात घेता, रेल्वे पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी हे दुहेरीकरण महत्त्वाचे ठरत आहे. तर नव्याने झालेला अहिल्यानगर ते बीड आणि लोणंद ते फलटण हे दोन्ही मार्ग एकेरी आहेत.
विभागातील दुहेरी रेल्वेमार्ग
मार्ग --- किमी
पुणे-दौंड : ७७.३३
पुणे-लोणावळा : ५९
पुणे-मिरज : २७९.५
दौंड-येवला : १७३.७५
विभागातील एकेरी रेल्वेमार्गाची आकडेवारी :
मार्ग --- किमी
मिरज-कोल्हापूर : २७.३५
लोणंद-फलटण : २६.६५
दौंड-बारामती : ४१.८
अहिल्यानगर-आष्टी : ६७.१८
आष्टी-अमळनेर : ३२.८४
अमळनेर-ऐंगवाडी : ३३.१२
ऐंगवाडी-बीड : ३५
पुणतांबा-शिर्डी : १७
क्रॉसिंगची अडचण दूर झाली
पुणे-मुंबई-चेन्नई आणि दौंड-मनमाड या प्रमुख मार्गांना जोडणाऱ्या गाड्यांना दौंड जंक्शनला बायपास देता यावा, यासाठी दौंड कॉर्ड लाइनची निर्मिती करण्यात आली. यामुळे वेळ वाचत आहे. तसेच दाैंड ते मनमाड आणि पुणे ते मिरजपर्यंत एकेरी मार्गामुळे अनेक वेळा गाड्यांना थांबावे लागत होते, दुहेरीकरणामुळे ही अडचण दूर झाली आहे. परिणामी वेळापत्रक अधिक शिस्तबद्ध झाली असून, गाड्यांची वेळेवर धावण्याची टक्केवारी वाढली आहे. विशेषतः दक्षिण भारतातून उत्तर भारताकडे आणि उलट जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस, सुपरफास्ट आणि मालगाड्यांसाठी हा मार्ग अधिक सुकर ठरणार आहे.
गेल्यावर्षी पुणे ते मिरज लोहमार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. आता दाैंड - मनमाड लोहमार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. संपूर्ण पुणे विभागात दुहेरीकरणाचे काम वेगात सुरू आहे. उर्वरित काम लवकर पूर्ण होणार आहे. याचा फायदा रेल्वेसह प्रवाशांना होणार आहे. - हेमंत कुमार बेहेरा, जनसंर्पक अधिकारी, मध्य रेल्वे
Web Summary : Pune railway division's track doubling is boosting speed and capacity. Key routes like Daund-Manmad and Pune-Miraj are complete, benefiting passengers and freight, reducing delays, and stimulating the economy with improved efficiency and reliability.
Web Summary : पुणे रेल मंडल में ट्रैक दोहरीकरण से गति और क्षमता बढ़ रही है। दौंड-मनमाड और पुणे-मिराज जैसे प्रमुख मार्ग पूरे हो गए हैं, जिससे यात्रियों और माल ढुलाई को लाभ हो रहा है, देरी कम हो रही है और बेहतर दक्षता और विश्वसनीयता के साथ अर्थव्यवस्था को बढ़ावा मिल रहा है।