संतोष धुमाळवर मोक्का; घायवळ गँगशी वैर अन् कोथरूड गोळीबारात निशाण्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 12:51 IST2025-10-11T12:50:54+5:302025-10-11T12:51:42+5:30
“तुझ्यामुळे मला अटक झाली, त्यामुळे १० लाख रुपये दे, नाहीतर माझी गोळी खायची ताकद ठेव,” अशी धमकी देण्यात आली.

संतोष धुमाळवर मोक्का; घायवळ गँगशी वैर अन् कोथरूड गोळीबारात निशाण्यावर
पुणे : घायवळ टोळीचा माजी सदस्य आणि सध्या तिचाच कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या संतोष आनंद धुमाळवर पुणे पोलिसांनी मोक्का (MCOCA) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कोथरूड परिसरात १० लाख रुपयांच्या खंडणीसाठी धमकी दिल्याच्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून, यामुळे गुन्हेगारी विश्वात एकच खळबळ उडाली आहे.
कोथरूड पोलिस ठाण्यातील माहितीनुसार, संतोष धुमाळसह त्याचे साथीदार विपुल उत्तम माझिरे आणि सागर गवासने यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात रोहित आखाडे नामक तरुणाने तक्रार दाखल केली आहे.
खंडणीसाठी धमकी; “गोळी खायची ताकद ठेव”
फिर्यादी रोहित आखाडे यांच्या म्हणण्यानुसार, २०२१ साली तो संतोष धुमाळ गँगसोबत कार्यरत होता. त्यावेळी एका गुन्ह्यात त्याला अटक झाली आणि पोलिसांना त्याने धुमाळबाबत काही माहिती दिली होती. याच गोष्टीचा राग मनात ठेवून धुमाळने काही दिवसांपूर्वी मध्यरात्री व्हिडिओ कॉल करत आखाडेला धमकावलं, “तुझ्यामुळे मला अटक झाली, त्यामुळे १० लाख रुपये दे, नाहीतर माझी गोळी खायची ताकद ठेव,” अशी धमकी देण्यात आली.
प्रथम ही बाब आखाडे यांनी दुर्लक्षित केली, मात्र ४ सप्टेंबर रोजी पुन्हा धुमाळने फोन करून खंडणीची मागणी केली. त्यानंतर तो आपल्या साथीदारांसह शास्त्रीनगर (कोथरूड) येथे पोहोचला आणि दहशत निर्माण करून निघून गेला. या घटनेनंतर अखेर आखाडे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.
घायवळ टोळीशी वैर; एकेकाळी “खास” सदस्य
संतोष धुमाळ हा एकेकाळी निलेश घायवळच्या टोळीत सक्रिय होता. मात्र काही वर्षांपूर्वी दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि धुमाळने गँग सोडली. यानंतर दोन्ही टोळ्यांमध्ये जमिनीच्या वादातून चढाओढ सुरू झाली. पोलिसांच्या माहितीनुसार, घायवळ गँगने धुमाळचा “काटा काढण्याचा” प्लॅन आखला होता आणि यासाठी काही टोळी सदस्यांना नेमण्यात आलं होतं.
१७ सप्टेंबरचा गोंधळ; चुकीच्या धुमाळवर गोळीबार
१७ सप्टेंबरच्या रात्री घायवळ टोळीतील पाच जणांनी संतोष धुमाळवर हल्ल्याचा ट्रॅप लावला. मात्र, हल्ल्याच्या आधी त्यांनी चांदणी चौकात दारू प्यायली. नशेत असताना कोथरूडच्या दिशेने जाताना त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला आणि ज्याला धक्का बसला तो प्रकाश धुमाळ नावाचा व्यक्ती होता. नशेतल्या गोंधळात त्यांनी प्रकाश धुमाळवरच गोळीबार केला आणि दुसऱ्या तरुणावर कोयत्याने हल्ला केला. गोळीबारात प्रकाश धुमाळ जखमी झाला, परंतु गँगचा खरा टार्गेट असलेला संतोष धुमाळ यावेळी वाचला.
संतोष धुमाळवर आतापर्यंत तब्बल १६ गुन्हे दाखल आहेत. खंडणी, मारहाण, खूनाचा प्रयत्न, दहशत निर्माण करणे अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये तो सहभागी असल्याची पोलिसांची माहिती आहे.
कोथरूड पोलिसांची कारवाई
या संपूर्ण प्रकरणी कोथरूड पोलिसांनी मोक्का अंतर्गत संतोष धुमाळ आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस उपायुक्त (झोन ३) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.