ससून रुग्णालयात बॉम्ब असल्याची अफवा; धमकीचा मेसेज करणारा निघाला सुरक्षारक्षकच
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 10:32 IST2025-05-15T10:31:53+5:302025-05-15T10:32:47+5:30
एका रुग्णाचा मोबाइल चोरून त्याद्वारे रुग्णालयाचे डॉक्टर व वैद्यकीय अधीक्षकांना धमकीचे मेसेज पाठवले होते.

ससून रुग्णालयात बॉम्ब असल्याची अफवा; धमकीचा मेसेज करणारा निघाला सुरक्षारक्षकच
पुणे : ससून रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याचा मेसेज तेथील डॉक्टरांना मिळाला आणि एकच खळबळ उडाली. मात्र, मेसेज पाठविणाऱ्या पोलिसांनी कसून तपास केला आणि तातडीने त्याला शोधून अटक केली. विशेष म्हणजे मेसेज करणारा ससून रुग्णालयातील सुरक्षारक्षकच निघाला.
अरविंद कृष्णा कोकणे (२९, रा. नागपूर चाळ, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशीकी, अरविंद कोकणे याने १२ मे रोजी एका रुग्णाचा मोबाइल चोरून त्याद्वारे रुग्णालयाचे डॉक्टर व वैद्यकीय अधीक्षकांना धमकीचे मेसेज पाठवले होते. धमकीमध्ये ससून रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. त्यामुळे रुग्णालयात खळबळ उडाली होती. डॉक्टरांनी तातडीने पोलिसांना ही माहिती दिली.
माहिती मिळताच बंडगार्डन पोलिस, बॉम्ब शोधक व नाशक पथक, अग्निशमन या तीन पथकांनी तात्काळ शोधमोहीम राबवून ससून परिसराची झडती घेतली. या प्रकारामुळे ससून रुग्णालय प्रशासन, उपचारासाठी आलेले रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, अंमलदार प्रदीप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, मनोज भोकरे, मनीष संकपाळ यांच्यासह पथकाने शोधमोहीम राबवून तांत्रिक तपासाद्वारे अरविंद कोकणे याला अटक केली. चौकशीत त्याने वाॅर्ड क्रमांक ७३ मधील एका महिला रुग्णाचा मोबाइल चोरी करून त्यावरून मेसेज केल्याची कबुली दिली. याबाबत डॉ. हरीश सुरेश टाटिया यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. वरिष्ठ निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.