पूजा खेडकर यांच्या बंगल्यावरील दरोडा प्रकरण; चतु:श्रृंगी पोलिसांकडून एकाला मुंब्रावरून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 20:00 IST2026-01-13T20:00:08+5:302026-01-13T20:00:22+5:30
पूजा खेडकर या बाहेरून घरी आल्या. त्यांना पाहून चोरट्याने त्यांचे चिकटपट्टीने हातपाय बांधून घरातील चीजवस्तू घेऊन त्यांनी पोबारा केला होता.

पूजा खेडकर यांच्या बंगल्यावरील दरोडा प्रकरण; चतु:श्रृंगी पोलिसांकडून एकाला मुंब्रावरून अटक
पुणे : बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या बंगल्यावरील दरोडा प्रकरणात चतु:श्रृंगी पोलिसांकडून एकाला मुंब्रावरून अटक करण्यात आली. खुम्मा दिलबहादूर शाही (वय ४०, रा. कौशल, मुंब्रा, जि. ठाणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. खुम्मा शाही हे खेडकर यांच्याकडे नुकताच कामाला ठेवलेल्या हिकमत या तरुणाचे वडील आहेत. पूजा खेडकर यांच्या नॅशनल हौसिंग सोसायटीतील बंगल्यामध्ये १० ते १५ दिवसांपूर्वी हिकमत हा कामाला लागला होता. शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास त्याने पूजाचे आईवडील व रखवालदार, कुक आणि वाहनचालक यांना गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले होते. त्याचवेळी पूजा खेडकर या बाहेरून घरी आल्या. त्यांना पाहून चोरट्याने त्यांचे चिकटपट्टीने हातपाय बांधून घरातील चीजवस्तू घेऊन त्यांनी पोबारा केला होता.
घरातील सर्वच प्रमुख हे बेशुद्ध असल्याने नेमका हा प्रकार कसा झाला, याची माहिती अद्याप समजू शकली नाही. पोलिस उपायुक्त रजनीकांत चिलुमुला, वरिष्ठ पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे व त्यांचे सहकारी यांनी हिकमत या नेपाळी नोकराचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याचे वडील खुम्मा शाही हे मुंब्रा येथे असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा मुंब्रा येथून त्यांना अटक केली.
बंगल्यातील सीसीटीव्हीमध्ये एकूण ७ आरोपी निष्पन्न झाले आहेत. खुम्मा शाही याच्याकडे चौकशी केल्यानंतर याबाबतची अधिक तपशील मिळू शकेल, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी सांगितले.