Pune Crime: बुधवार पेठेतील डिस्को-मॅचबॉक्स बिल्डिंगवर छापे; १५ बांगलादेशींसह १८ जण ताब्यात
By किरण शिंदे | Updated: April 28, 2026 11:13 IST2026-04-28T11:11:16+5:302026-04-28T11:13:33+5:30
Crime News - ताब्यात घेतलेल्या काही महिला देहविक्री व्यवसायात गुंतलेल्या होत्या. यामध्ये बांगलादेशातून बेकायदेशीररित्या भारतात आलेल्या महिलांचाही समावेश आहे.

Pune Crime: बुधवार पेठेतील डिस्को-मॅचबॉक्स बिल्डिंगवर छापे; १५ बांगलादेशींसह १८ जण ताब्यात
पुणे - शहरातील बुधवार पेठ परिसरात सुरू असलेल्या अवैध देहविक्री व्यवसायावर पोलिसांनी मोठी कारवाई करत संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. डिस्को आणि मॅचबॉक्स (माचीस) बिल्डिंगमध्ये टाकलेल्या छाप्यात एकूण १८ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, यात १५ बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या कारवाईदरम्यान एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार पेठेतील काही इमारतींमध्ये गुप्तपणे देहविक्री व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार विशेष पथक तयार करून डिस्को आणि मॅचबॉक्स बिल्डिंगमध्ये एकाच वेळी छापा टाकण्यात आला. या धाडीत अनेक महिला आणि काही पुरुष संशयास्पद अवस्थेत आढळून आले.
चौकशीत समोर आले की, ताब्यात घेतलेल्या काही महिला देहविक्री व्यवसायात गुंतलेल्या होत्या. यामध्ये बांगलादेशातून बेकायदेशीररित्या भारतात आलेल्या महिलांचाही समावेश आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये
१५ बांगलादेशी असून, त्यात ११ महिला, ३ पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे, ताब्यात घेतलेल्यामध्ये १५ वर्षे ४ महिन्यांची एक अल्पवयीन मुलगी आढळून आली. प्राथमिक तपासात तिला जबरदस्तीने देहविक्री व्यवसायात ढकलण्यात आल्याचे स्पष्ट झाले असून, तिची सुटका करण्यात आली आहे.
या रॅकेटचा मुख्य सूत्रधार म्हणून सुमित मिलिंद चव्हाण याचे नाव समोर आले आहे. तो दोन वेगवेगळ्या इमारतींमधून हा व्यवसाय चालवत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. तसेच ज्योती उर्फ सबीना शेख ही ‘अक्का’ म्हणून संपूर्ण व्यवहार सांभाळत होती. राहुल शर्मा आणि समीर हलवदार हे दोघे मॅनेजर म्हणून काम करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी संबंधितांकडून मोबाईल फोन आणि हिशोबाच्या डायऱ्या जप्त केल्या असून, या माध्यमातून आर्थिक व्यवहार आणि ग्राहकांबाबत अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे. पोलिसांनी या प्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आला आहे.