Pune Crime : भिगवण परिसरात खुलेआम वेश्याव्यवसाय, कारवाईची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 12:42 IST2025-10-10T12:41:44+5:302025-10-10T12:42:00+5:30
अनेकदा मालकांकडून कोणताही करारनामा न करता ही ठिकाणे भाड्याने दिली जातात, ज्यामुळे तिथे बेकायदेशीर व्यवसायांना मोकळीक मिळते

Pune Crime : भिगवण परिसरात खुलेआम वेश्याव्यवसाय, कारवाईची मागणी
भिगवण : बारामती-भिगवण मार्गालगत तसेच पुणे-सोलापूर महामार्गावरील काही हॉटेल्स आणि लॉजमध्ये खुलेआम वेश्याव्यवसाय आणि सेक्स रॅकेट सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गंभीर प्रकारांकडे पुणे ग्रामीण पोलिस प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
या मार्गावरील अनेक हॉटेल्स आणि लॉज, जी मूळ मालकांकडून भाडेतत्त्वावर घेतली जातात, तिथे वेश्याव्यवसायाला प्रोत्साहन दिले जात आहे. अनेकदा मालकांकडून कोणताही करारनामा न करता ही ठिकाणे भाड्याने दिली जातात, ज्यामुळे तिथे बेकायदेशीर व्यवसायांना मोकळीक मिळते. या ठिकाणी पैशाचे आमिष दाखवून पुणे जिल्ह्यासह परराज्यातील महिलांना आणि मुलींना देहविक्रीसाठी भाग पाडले जात आहे. यामुळे भविष्यात मोठा अनर्थ घडण्याची भीती व्यक्त होत आहे.
स्थानिक रहिवासी या प्रकारांमुळे वैतागले असून, त्यांनी पोलिसांकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मात्र, स्थानिक पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. गत आठवड्यात दौंड तालुक्यातील खडकी येथील एका लॉजवर उपविभागीय पोलिस अधिकारी आणि पोलिस अधीक्षक कार्यालयाला भेटल्यानंतरच कारवाई झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यशैलीबाबत संशय निर्माण झाला आहे.
या गंभीर प्रकरणाकडे पुणे ग्रामीण पोलिस प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी नियमित तपासणी आणि कायदेशीर उपाययोजनांची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.