स्वारगेट पीडितेचा लेटर बॉम्ब..! पुणे पोलिसांवर गंभीर आरोप करत म्हणाली, ‘थोडा उशीर झाला म्हणून..'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 15:35 IST2025-03-27T15:30:04+5:302025-03-27T15:35:22+5:30
स्वारगेट प्रकरण : ‘आरोपीने दोनदा बलात्कार करून तिसऱ्यांदा…’ पत्रातून पीडितेचा मोठा खुलासा

स्वारगेट पीडितेचा लेटर बॉम्ब..! पुणे पोलिसांवर गंभीर आरोप करत म्हणाली, ‘थोडा उशीर झाला म्हणून..'
- किरण शिंदे
पुणे - पुण्यातील स्वारगेट परिसरात घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील पीडित तरुणीने पत्राद्वारे पुणेपोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. आपल्या पत्रात तिने वैद्यकीय चाचणी, पोलिसांची भूमिका आणि सरकारी वकिलांच्या नियुक्तीबाबत तिला आलेल्या अडचणी स्पष्ट केल्या आहेत. पीडितेने तिच्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून असीम सरोदे यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. मात्र, पोलिसांकडून तिला उशीर झाल्याचे सांगण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे. या आरोपांमुळे पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीने तिच्या पत्रात वैद्यकीय आणि पोलीस प्रक्रियेतील त्रासदायक अनुभव स्पष्टपणे मांडले आहेत. वैद्यकीय चाचणीबाबत तिने सांगितले आहे की, पुरुष वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिच्या इच्छेविरुद्ध तपासणी केली. तसेच पोलिस चौकशीदरम्यान तिला अनेक पुरुष पोलीस अधिकाऱ्यांसमोर अत्याचाराच्या घटनांचे तपशीलवार वर्णन करावे लागले.
पीडितेने तिच्या पत्रात अत्याचाराच्या घटनांचा उल्लेख करताना म्हटले आहे की, आरोपी दत्ता गाडे याने दोनदा बलात्कार केल्यानंतर पुन्हा लैंगिक जबरदस्तीचा प्रयत्न केला. मात्र, पीडितेच्या जोरदार प्रतिकारामुळे तो पळून गेला, असे तिने नमूद केले आहे.
स्वारगेट बलात्कार प्रकरणात आरोपी गाडेच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
या पत्रात सरकारी वकिलांच्या नियुक्तीबाबतही पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पोलिसांनी तिला तीन वकिलांची नावे सुचवली, परंतु तिने असीम सरोदे यांची मागणी केली असता, तिला उशीर झाल्याचे सांगण्यात आले. “माझा वकील निवडण्याचा अधिकार नाही का?” असा प्रश्नही तिने पत्रातून उपस्थित केला आहे.
दरम्यान, अत्याचाराच्या घटनेदरम्यान झालेल्या मानसिक स्थितीबद्दलही तिने पत्रात लिहिले आहे. ती ओरडली असता तिचा आवाज अचानक बसला आणि निघेनासा झाला. त्याचवेळी विरोध केल्यामुळे मारल्या गेलेल्या अन्य पीडितांची आठवण तिला झाली. त्यामुळे आपला जीव वाचवणे तिला अधिक महत्त्वाचे वाटले, असेही तिने नमूद केले आहे.
पोलिसांची भूमिका संशयास्पद?
पीडितेच्या आरोपांमुळे पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अत्याचारग्रस्त महिलांना न्याय मिळावा यासाठी तिने स्वतः सरकारी वकील निवडण्याचा अधिकार असावा, अशी मागणी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून पोलिसांच्या भूमिकेवर आणि पीडितेच्या मागण्यांवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.