पुणे हादरले ..! एनडीएमधील विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल; पोलीस तपास सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 12:22 IST2025-10-10T12:20:52+5:302025-10-10T12:22:21+5:30
- अंतरीक्षचे वडील हे देखील माजी सैनिक आहेत. देशसेवेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अंतरीक्ष नुकताच पुण्यात आला होता.

पुणे हादरले ..! एनडीएमधील विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल; पोलीस तपास सुरु
पुणे - देशातील प्रतिष्ठित राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) मध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज (शुक्रवारी) पहाटे १८ वर्षीय विद्यार्थ्याने आपल्या खोलीत गळफास घेऊन जीवन संपवल्याची माहिती समोर आली असून, या घटनेने केवळ NDA परिसरातच नव्हे, तर संपूर्ण पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
मृत विद्यार्थ्याचे नाव अंतरीक्ष कुमार असे असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील लखनौ जिल्ह्यातील रहिवासी आहे. विशेष म्हणजे, अंतरीक्षचे वडील हे देखील माजी सैनिक आहेत. देशसेवेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अंतरीक्ष नुकताच पुण्यात आला होता. जुलै महिन्यात त्याने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) मध्ये प्रवेश घेतला होता आणि तो सध्या पहिल्या सत्रात शिक्षण घेत होता.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज पहाटे अंतरीक्षने आपल्या वसतिगृहातील खोलीत बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. इतर सहाध्यायांनी तो प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात आल्यानंतर वरिष्ठांना माहिती देण्यात आली. तत्काळ पोलिसांना कळविण्यात आले आणि उत्तमनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
अंतरीक्षने आत्महत्या का केली याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक चौकशीत कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, “घटनेचा तपास सुरू असून विद्यार्थ्याच्या मित्रपरिवार आणि शिक्षकांकडून माहिती घेतली जात आहे.”
सध्या उत्तमनगर पोलिस स्टेशन या प्रकरणाचा तपास करत असून, मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. पोलिस आत्महत्येच्या कारणांचा शोध घेत आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे NDA परिसरात शोककळा पसरली असून, सहाध्यायी आणि प्रशिक्षक वर्ग अत्यंत दुःखी झाला आहे. देशसेवेसाठी उत्साहाने प्रशिक्षण घेणाऱ्या तरुण विद्यार्थ्याने असे टोकाचे पाऊल उचलल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.