शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एक कोटींची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 12:22 IST2025-10-12T12:22:27+5:302025-10-12T12:22:39+5:30
शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल अशी सूचना देत चोरट्यांनी त्याला सोशल मीडियावरील एका ग्रुपमध्ये सामील केले आणि गुंतवणुकीच्या योजनांची माहिती दिली.

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एक कोटींची फसवणूक
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून पाषाण भागातील एका व्यावसायिकाची सायबर चोरट्यांनी एक कोटी ११ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरोधात शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यापूर्वी, याबाबत एका व्यावसायिकाने बाणेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक पाषाण भागात राहतो. सायबर चोरट्यांनी मे महिन्यात त्यांच्या मोबाईल नंबरवर मेसेज पाठविला होता. त्या चोरट्यांनी शेअर बाजारातील गुंतवणूक करणाऱ्या संस्थेतील प्रतिनिधी असल्याचा खोटा दावा करून त्यांना गुंतवणुकीचे आमिष दाखविले. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल अशी सूचना देत चोरट्यांनी त्याला सोशल मीडियावरील एका ग्रुपमध्ये सामील केले आणि गुंतवणुकीच्या योजनांची माहिती दिली.
त्यामुळे व्यावसायिकाने सुरुवातीला काही रक्कम गुंतविली. चोरट्यांच्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने पैसे जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा मिळाल्याचा भास दाखविला, मात्र प्रत्यक्षात परतावा त्यांच्या खात्यात जमा केलेला नव्हता. परतावा मिळाल्याचा भास पाहून व्यावसायिकाने आणखी रक्कम गुंतविली. गेल्या चार महिन्यांत व्यावसायिकाने सायबर चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी एकूण १ कोटी ११ लाख ८० हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांना कोणताही परतावा दिला नाही.
नंतर पैसे परत मिळविण्याचा प्रयत्न करीत चोरट्यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधल्यास फसवणूक झाल्याचे समजले. त्यानंतर व्यावसायिकाने तक्रार नोंदविण्यासाठी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक देवकाते करीत आहेत.