Pune Crime : वाघोलीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा तीन साथीदारांकडून डोक्यात दगड घालून खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 11:31 IST2025-10-05T11:30:55+5:302025-10-05T11:31:48+5:30
हे तिघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Pune Crime : वाघोलीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा तीन साथीदारांकडून डोक्यात दगड घालून खून
वाघोली : पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून, आयुष्य कोमकर हत्या प्रकरण आणि कोथरूड गोळीबार प्रकरणाची धग अजूनही ओसरलेली नसतानाच वाघोली परिसरात पुन्हा एकदा खूनाची घटना घडली आहे.
अधिकच्या माहितीनुसार, उबाळे नगर परिसरातील कृष्णा लॉजसमोर रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, मृताचे नाव बादल शेख (वय २४, रा. खराडी) असे असून, त्याचा त्याच्याच तीन साथीदारांनी खून केला आहे. हे तिघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शनिवारी रात्री खराडी परिसरात आरोपी आणि बादल शेख यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर चौघे एका दुचाकीवरून वाघोलीतील कृष्णा लॉज येथे आले. रूम घेण्याबाबत चौकशी करत असताना पुन्हा भांडण उफाळले. या वेळी आरोपींनी बादल शेखवर वार करून त्यानंतर दगड घालून ठार मारले. घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. पोलिसांकडून या प्रकरणातील तिघा आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.