पुण्यात आणखी हुंडाबळी, गरोदर पूजाने उचलले टोकाचे पाऊल; महाळुंगे येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 13:46 IST2025-05-25T13:42:17+5:302025-05-25T13:46:00+5:30

-पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह, महिनाभरानंतरही कारवाई शून्य  

pune crime More dowry victims in Pune, pregnant Pooja takes extreme step | पुण्यात आणखी हुंडाबळी, गरोदर पूजाने उचलले टोकाचे पाऊल; महाळुंगे येथील घटना

पुण्यात आणखी हुंडाबळी, गरोदर पूजाने उचलले टोकाचे पाऊल; महाळुंगे येथील घटना

- प्राची पाटील 

छत्रपती संभाजीनगर :
 सासरच्या छळास कंटाळून पुण्यातील वैष्णवी हगवणे विवाहितेने या विवाहितेने आत्महत्या केली. राजकीय पार्श्वभूमी असल्याने या प्रकरणाची राज्यभरात चर्चा होत आहे. परंतु वैष्णवीप्रमाणे पुण्यातील हुंडाबळीचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे.

मूळ परभणी जिल्ह्यातील पूजा गजानन निर्वळ या २२ वर्षीय विवाहितेने स्पाइन सिटी, महाळुंगे येथे २७ एप्रिल रोजी गळफास घेऊन जीवन संपवले, ही आत्महत्या नसून हत्याच असल्याचा तिच्या आई वडिलांचा आरोप आहे. गरीब कुटुंबातील असल्याने या प्रकरणाची कुठेही दखल घेण्यात आलेली नाही. पोलिसही माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचा पूजाच्या आई रेखा बोचरे यांचा आरोप आहे. 'काही नको, फक्त आमच्या पूजाला न्याय मिळवून द्या', अशी आर्त हाक त्यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.

पूजाने सासरच्या अत्याचाराला कंटाळून लग्नाच्या पाच महिन्यांतच आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. ही घटना घडली तेव्हा ती ३ महिन्यांची गरोदर होती. वडील गणेश बोचरे यांनी महाळुंगे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. परभणीजवळील एका छोट्याशा खेड्यातील बोचरे कुटुंबाला एफआयआर दाखल करण्यासाठीही रात्री ११ वाजेपर्यंत पोलिस ठाण्यात बसवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?

तुळजापूर (ता. जि. परभणी) गावातील गणेश बोचरेंनी मुलगी पूजाचे लग्न शेलवाडीतल्या गजानन निर्वळ यांच्यासोबत पक्के केले. लग्नात थेट हुंडा न घेता त्यांनी फ्रिज-कपाटापासून सर्व घरगुती सामानाची मागणी व लग्न चांगल्या पद्धतीने करून मागितले. ३ डिसेंबर २०२४ ला लग्न झाले. त्यानंतर पूजा नवरा, सासू-सासरे, नणंद व तिच्या २ मुलांसह पुण्यातील स्पाइन सिटीत राहायला आली. सुरुवातीचे ३ महिने आनंदात गेले. मात्र नंतर गाडी घेण्यासाठी माहेरून ५० हजार रुपये आण, असा तगादा पती गजानन निर्वळ याने पूजाकडे लावला. आधीच लग्नाची उसनवारी झाल्याने वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला. येथूनच पूजाला पतीकडून मानसिक व शारीरिक त्रास देण्यास सुरुवात झाली.

शेवटचे बोलणे

गुढीपाडव्याला आई-वडिलांसोबत पूजाची शेवटची भेट झाली होती. त्यावेळी छळाविषयी तिने सांगितले. पण समजूत घालून तिला त्यांनी परत पाठवले. पूजाचा मृत्यू झाला त्या दिवशी सकाळी तिवे आईसोबत शेवटचे बोलणे झाले. ती आनंदात असल्याचे आईला जाणवले. संध्याकाळी बोलू, असे म्हणून त्यांनी बोलणे संपवले. मात्र त्यानंतर थेट तिच्या मृत्यूचीच बातमी आली.

दुर्लक्षित हुंडाबळी?

पूजाचे वडील ट्रक ड्रायव्हर आहेत. आई दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करते. आई रेखा बोचरे यांनी सांगितले, झेपत नसतानाही लग्नात ३ लाखांचा खर्च केला. २ लाखांचे सामान दिले. 'माझी मुलगी गरीब कुटुंबातली आहे, म्हणून पोलिसांनी आजवर कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही,' असा आरोप त्यांनी केला.

ती आत्महत्या करूच शकत नाही

माझी मुलगी अभ्यासात खूप हुशार होती. परिस्थितीमुळे आम्ही लवकर तिचे लग्न लावले. लहानपणापासून कष्ट करत तिने १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. लग्नानंतरही ती नर्सिंगचे शिक्षण घेत होती. तिची मोठी स्वप्ने होती. आत्महत्या करणाऱ्यातली ती नव्हतीच. तिने आत्महत्या केली यावर आमच्या गावात कोणालाही विश्वास नाही. अजूनही पोलिसांनी आम्हाला शवविच्छेदन अहवाल दिलेला नाही. फोन केल्यावर पोलिस सुटीवर असल्याचे सांगतात. -रेखा बोचरे, पूजाची आई

या प्रकरणात हुंडाबळी, तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित आरोपींनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला आहे. याबाबत सोमवारी (२६ मे) खेड (जि. पुणे) न्यायालयात सुनावणी होणार आहे. -नितीन गिते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, महाळुंगे

एमआयडीसी पोलिस ठाणे

या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे. माझ्या वडिलांची तब्येत बरी नसल्याने मी गाची आहे. सोमवारपासून तपासास पुन्हा सुरुवात होईल.-अनिस मुल्ला, तपास अधिकारी, महाळुंगे पोलिस ठाणे

Web Title: pune crime More dowry victims in Pune, pregnant Pooja takes extreme step

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.