माणसाचा सांगाडा सापडला ? मानवी सांगाड्यामुळे नगर रस्त्यावर उडाला गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 20:45 IST2025-08-21T20:44:34+5:302025-08-21T20:45:00+5:30
परिसरात काही काळ भिती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या गाड्या व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्या.

माणसाचा सांगाडा सापडला ? मानवी सांगाड्यामुळे नगर रस्त्यावर उडाला गोंधळ
पुणे - येरवडा परिसरात नगर रस्त्यालगत एक मानवी सांगाडा दिसल्याने गुरुवारी दुपारी चांगलाच गोंधळ उडाला आणि नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सांगाड्याची तपासणी करून हा सांगाडा मानवी नसून प्लास्टर ऑफ पॅरिसपासून तयार केलेला कृत्रिम असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर नागरिकांसह पोलिसांनीही सुटकेचा निश्वास सोडला.
येरवड्यात नगर रस्त्यावरील गोल्डन आर्क लॉज समोर वर्दळीच्या ठिकाणी “माणसाचा सांगाडा सापडला” अशी चर्चा गुरुवारी दुपारी पसरली. यामुळे परिसरात काही काळ भिती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या गाड्या व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्या.
पोलिसांनी पाहणी केल्यानंतर सांगाडा छाती व कमरेचा असल्याचे आढळले. हा सांगाडा मानवी व खरा असल्याचा संशय येत होता. मात्र बारकाईने तपासल्यावर तो प्रयोगशाळेत वापरण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेला आर्टिफिशियल सांगाडा असल्याचे स्पष्ट झाले. तो तारेने जोडून तयार केल्याचे स्पष्ट झाले. यानंतर सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान, पोलिसांनी सांगाडा ताब्यात घेवून यात कोणताही गुन्हेगारी प्रकार किंवा संशयास्पद बाब आढळली नसल्याचे स्पष्ट केले.