पादचारी तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून, दुचाकीस्वार हल्लेखोर पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 18:00 IST2026-01-02T17:59:02+5:302026-01-02T18:00:14+5:30
दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्याला अडवले. त्याच्याबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली.

पादचारी तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून, दुचाकीस्वार हल्लेखोर पसार
पुणे : दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी पादचारी तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना हडपसरमधील फुरसुंगी भागात गुरुवारी सायंकाळी घडली. पसार झालेल्या दुचाकीस्वारासह साथीदाराविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. आकाश कृष्णा चाबुकस्वार (२१, रा. फुरसुंगी, हडपसर-सासवड रस्ता) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दुचाकीस्वारासह साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पसार झालेल्या हल्लेखोरांना पकडण्यासाटी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश चाबुकस्वार गुरुवारी (दि. १) सायंकाळी फुरसुंगी परिसरातून निघाला होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्याला अडवले. त्याच्याबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली. दुचाकीवरील दोघांनी त्याला मारहाण केली. त्याच्या डोक्यात दगड घालून आरोपी भरधाव वेगात पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या आकाशला नागरिकांनी लगेचच खासगी रुग्णालयात दाखल केले.
उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. पसार झालेल्या हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. आकाश याच्या खुनामागचे निश्चित कारण समजू शकले नाही. वैमनस्यातून खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.