पुण्यात फटाके वाजवण्याबाबत नियमावली जाहीर; शहरात रात्री १० नंतर फटाके वाजवण्यास बंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 15:29 IST2025-10-08T15:29:31+5:302025-10-08T15:29:49+5:30
पोलिसांच्या नियमांनुसार मोठा आवाज करणारे ‘ॲटमबाॅम्ब’ वाजवणे, बाळगणे, तसेच विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे

पुण्यात फटाके वाजवण्याबाबत नियमावली जाहीर; शहरात रात्री १० नंतर फटाके वाजवण्यास बंदी
पुणे : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील फटाके विक्री स्टाॅल आणि फटाके वाजवण्याबाबत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी नियमावली जाहीर केली अहे. त्यानुसार रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत फटाके वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांचे आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
फटाके वाजवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने नियमावली आखून दिली आहे. ध्वनी आणि वायू प्रदूषण टाळण्यासाठी नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत फटाके वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांच्या नियमांनुसार मोठा आवाज करणारे ‘ॲटमबाॅम्ब’ वाजवणे, बाळगणे, तसेच विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. शहरातील रुग्णालये, तसेच शैक्षणिक संस्था, न्यायालयाच्या १०० मीटर परिसरात शांतता क्षेत्र आहे. या भागात दिवसा आणि रात्री फटाके वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आदेशात म्हटले आहे.
फटाके विक्रेत्यांनी नियमावलीचे पालन करणे गरजेचे आहे. पुणे शहर परिसरात २० ते २४ ऑक्टोबर या कालवधीत तात्पुरत्या स्वरुपात फटाके विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. महामार्गावर, पुलावर फटाके वाजवणे, अग्निबाण (रॉकेट) उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. फटाक्यांच्या आवाजाची मर्यादा १२५ डेसिबलपेक्षा जास्त नसावी, नियमावलीचे पालन करणे बंधनकारक आहे. नियमावलीचे पालन न केल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.