पॉलिशच्या बहाण्याने दागिने चोरणारी टोळी पकडली

By Admin | Updated: March 1, 2015 01:01 IST2015-03-01T01:01:33+5:302015-03-01T01:01:33+5:30

दुपारच्या वेळी नागरिकांच्या घरी जाऊन भांडी आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांना पॉलिश करुन देण्याच्या बहाण्याने दागिने लंपास करणारी टोळी गजाआड करण्यात आली आहे.

Pulled up with jewelry, grabbed the gang stolen jewelery | पॉलिशच्या बहाण्याने दागिने चोरणारी टोळी पकडली

पॉलिशच्या बहाण्याने दागिने चोरणारी टोळी पकडली

पुणे : दुपारच्या वेळी नागरिकांच्या घरी जाऊन भांडी आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांना पॉलिश करुन देण्याच्या बहाण्याने दागिने लंपास करणारी टोळी गजाआड करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपींकडून आठ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला असून १४ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.
मुकेशकुमार गोपाळकुमार साह (वय २७), राजेशकुमार वासुदेव साह (वय २८), दिलीपकुमार सरजुग साह (वय २९), रवीकुमार सियाराम गुप्ता (वय ३२), सुनिलकुमार सत्यनारायण साह (वय २९, सर्व रा. पनवेल, जि. रायगड) अशी अटक आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी मुळचे भागलपुरचे, बिहारचे रहीवासी आहेत. मुकेशकुमार याच्याबाबत खब-यामार्फत माहिती मिळाल्यानंतर त्याला पकडण्यात आले. आरोपींनी सहकारनगर, वाकड, वारजे माळवाडी, दत्तवाडी, समर्थ, विश्रांतवाडी, खडक, भोसरी, स्वारगेट, मुंढवा या पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये १४ गुन्हे केले आहेत. आरोपींकडून २६६ ग्रॅम सोन्याचे दागिने दोन मोटारसायकल, मोबाईल आणि रोकड असा एकूण ८ लाख २१ हजार २३९ रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
आरोपी २०१३ पासून तळोजा एमआयडीसीमध्ये भाड्याच्या खोलीमध्ये रहात होते. मुंबई, पुणे परिसरात सलग गुन्हे करुन ते पुन्हा बिहार येथील मुळ गावी जात होते. त्यांच्या खोलीमधून भांडी आणि सोने पॉलीश करण्याची पावडर मिळाली असून ही पावडर अहमदाबाद येथून विकत आणत होते. पुण्यासह नवी मुंबई, ठाणे, सांगली,सातारा, कोल्हापुर, नाशिक, मुंबईमध्येही हात साफ केला आहे. आरोपींना न्यायालयाने ३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Pulled up with jewelry, grabbed the gang stolen jewelery