Provide ujani water for Indapur: Chandrakant Patil | इंदापूरसाठी उजनीचे पाणी देऊ : चंद्रकांत पाटील 
इंदापूरसाठी उजनीचे पाणी देऊ : चंद्रकांत पाटील 

ठळक मुद्दे उपसा सिंचन योजनेचे प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

पुणे: इंदापूरसाठीपाणी मिळणे गरजेचे आहे. उजनी धरणातूनपाणी उचलले तर ते शक्यही होईल. तसा निर्णय घेतला जाईल, तत्पुर्वी धरणातून पाणी उचलण्यासाठी म्हणून उपसासिंचन योजनेचे प्रस्ताव तयार करून ते त्वरीत पाटंबंधारे खात्याकडे द्यावेत,असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी इंदापूर तालुक्यातील ग्रामस्थांना दिले.
जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीसाठी पाटील विधानभवनात आले होते. विधानभवनाच्या आवारात त्यांची भेट घेण्यासाठी म्हणून सकाळीच इंदापूर तालुक्यातील २७ गावांमधील नागरिक ठाण मांडून बसले होते. आमदार दत्ता भरणे, प्रताप पाटील यांच्या नेतृत्वाखाली या नागरिकांनी धरणे आंदोलन सुरू केले. प्रताप पाटील म्हणाले, इंदापूरमधील निरगुडे, अकोले, कळस अशी एकूण २७ गावे पाण्यावाचून तहानलेली आहेत. प्यायलाही पाणी नाही. तरीही पाटंबंधारे खाते दखल घ्यायला तयार नाही, त्यामुळेच असे आंदोलन करून लक्ष वेधण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. 
चंद्रकांत पाटील थेट बैठकीसाठी निघून गेल्यामुळे आंदोलक संतप्त झाले, मात्र आतून बैठकीनंतर चर्चा करण्यात येईल असा निरोप आल्यानंतर ते शांत झाले. प्रताप पाटील यांनी सांगितले की, पाटबंधारे खात्याचे अधिकारी त्यांच्या राजकीय दबाव असल्याची माहिती देतात. यापुर्वी खडकवासला धरणातून पाणी सोडले की ते कॅनॉलद्वारे या परिसरात येत असे. त्यातून १४ तलाव भरले जात. त्यामुळे या २७ गावांची गरज भागत होती. आता कोणतीही पुर्वसुचना न देता किंवा पर्यायी व्यवस्था न करता थेट पाणी देणे बंद करण्यात आले. 
बैठकीमध्ये आत आमदार भरणे यांनी पाटील यांच्यापुढे हीच तक्रार केली. पाटील यांनी सर्व आंदोलकांना आत बोलावून त्यांची भेट घेतली व म्हणणे ऐकले. उजनी धरणातील पाणी पुढे वाहून कर्नाटकला जाते. ते पाणी अडवले तर इंदापूरमधील या २७ गावांशिवाय अन्य गावांची पाण्याची गरज भागू शकते. हे लक्षात घेऊन तसा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. गावांनी पाटबंधारे खाते तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात उपसा सिंचन योजनेचे प्रस्ताव पाठवावेत, त्यांना त्वरीत मंजूरी देऊ. पाण्याशिवाय कोणतेही गाव राहू देणार नाही असे आश्वासन पाटील यांनी दिले. 


Web Title: Provide ujani water for Indapur: Chandrakant Patil
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.