आंदोलनाचा इतर रुग्णांना त्रास होतोय; दीनानाथ रुग्णालयाबाहेर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 13:45 IST2025-04-09T13:43:45+5:302025-04-09T13:45:53+5:30
आंदोलनामुळे रुग्णालयमधील रुग्ण व नातेवाईक यांना खुप त्रास हो असून रुग्णांच्या मनामध्ये नाहक भिती उत्पन्न होत आहे

आंदोलनाचा इतर रुग्णांना त्रास होतोय; दीनानाथ रुग्णालयाबाहेर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर रुग्णांच्या जीवापेक्षा पैशांना प्राधान्य दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. २९ मार्च रोजी झालेल्या या दुर्दैवी घटनेनंतर तनिषा भिसे (वय २७) या सात महिन्यांच्या गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला. त्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. त्यानंतर पुण्यातील पक्ष, संघटना यांच्याकडून रुग्णालयाबाहेर मोर्चा, आंदोलने, निदर्शने आंदोलने सुरु आहेत. याचा रुग्णालयातील रुग्ण, नातेवाईक तसेच डॉक्टरांना त्रास होत असल्याने पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी प्रतिबंधात्मक आदेश काढले आहेत.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय येथे तनिषा सुशांत भिसे या महिलेचा उपचारामध्ये दिरंगाई झाल्याने मृत्यु झाला आहे. त्यानंतर ५ मेपासुन विविध पक्षाचे कार्यकर्ते यांच्याकडून मोर्चे, आंदोलने, निदर्शने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वार व आवारात होत आहेत. त्याचा रुग्णालय मधील रुग्ण व नातेवाईक यांना खुप त्रास जात आहे. तसेच अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याचप्रमाणे रुग्णांच्या मनामध्ये नाहक भिती उत्पन्न होत आहे. आंदोलनामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊन रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेला व रुग्णांच्या नातेवाईकांना जाण्यायेण्याकरिता अडचण निर्माण होत आहे. मोर्चा, आंदोलने, निदर्शने मध्ये बाहेरील व्यक्तींना मोठ्या जमावाने भाषणे, घोषणा देणे सार्वजनिक शांततेचा भंग करुन रुग्णालयाचे वातावरण बाधित करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या कार्यात व्यत्यय निर्माण झाल्याचे निदर्शनास येत आहे.
रुग्णालयाच्या आवारात येणाऱ्या रुग्ण, रूग्णांचे नातेवाईक, डॉक्टर, कर्मचारी यांच्या हिताच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच रुग्णालयात उपचार घेणा-या रुग्णास शांततामय वातावरणाची आवश्यकता आहे. म्हणून दीनानाथ मंगेशकर हॉस्पीटल पुणे व सभोवतालच्या १०० मीटर परिसरात निर्बंध घालणे गरजेचे असल्याचे सांगत शर्मा यांनी प्रतिबंधात्मक आदेश घातले आहेत.
काय आहेत प्रतिबंधात्मक आदेश...
१. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय पुणे, हा परिसर व त्याचे सभोवतालच्या १०० मीटर परिसरात रुग्णांच्या नातेवाईकाशिवाय इतर इसमांना एकत्र जमण्यास किंवा रुग्णालयात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.
२. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय पुणे, परिसरात दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात येत आहे. सदरचा आदेश संबंधीत रुग्ण, रुग्णवाहिका चालक, रुग्णालयातील कर्मचारी पोलीस अधिकारी व कर्मचारी/सुरक्षा अधिकारी यांना लागु होणार नाहीत.
३. सदर रुग्णालय परिसरात ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास मनाई करण्यात येत आहे..
४. सदर रुग्णालय परिसरात कोणताही आक्षेपार्ह, वाद निर्माण होईल असा मजकूर लिहिण्यास, अगर छापील मजकूर चिकटविण्यास मनाई करण्यात येत आहे.
सदरचा आदेश दि. ०९/०४/२०२५ रोजी पासून ते दिनांक १९/०४/२०२५ रोजीपर्यंत अंमलात राहील. सदरच्या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहिता कलम २२३ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.