कंपनीऐवजी ठेकेदाराकडून डांबर खरेदीचा प्रस्ताव

By Admin | Updated: June 11, 2015 06:12 IST2015-06-11T06:12:26+5:302015-06-11T06:12:26+5:30

शहरातील रस्त्यांची दुरुस्ती, डांबरीकरण या कामांसाठी महापालिकेकडून दर वर्षी थेट कंपन्यांकडून डांबर खरेदी केली जाते, मात्र यंदा कंपन्याऐवजी

Proposal to buy tariff by the contractor instead of the company | कंपनीऐवजी ठेकेदाराकडून डांबर खरेदीचा प्रस्ताव

कंपनीऐवजी ठेकेदाराकडून डांबर खरेदीचा प्रस्ताव

पुणे : शहरातील रस्त्यांची दुरुस्ती, डांबरीकरण या कामांसाठी महापालिकेकडून दर वर्षी थेट कंपन्यांकडून डांबर खरेदी केली जाते, मात्र यंदा कंपन्याऐवजी ठेकेदाराकडून १ हजार मेट्रिक टन डांबर खरेदी करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर मांडला आहे. ठेकेदाराकडून जास्त डिस्काउंट दिला जाणार असल्याचे कारण देऊन हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. स्थायी समितीच्या निर्णयावर या डांबर खरेदीचे भवितव्य अवलंबून आहे.
शहरातील मुख्य रस्त्यांसह प्रभागातील रस्त्यांचे डांबरीकरण, दुरूस्ती याकरिता महापालिकेला दर वर्षी हजारो मेट्रिक टन डांबराची आवश्यकता भासते. डांबर तयार करणाऱ्या कंपन्यांकडून महापालिका दर वर्षी या डांबराची खरेदी करीत होती. मात्र, या वर्षी अचानक ठेकेदारांकडून डांबर खरेदी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याकरिता निविदाप्रक्रिया राबवून त्यांनी सर्वांत जास्त डिस्काऊंट देणाऱ्या ठेकेदाराची निवड केली. त्यानुसार या ठेकेदाराकडून १ हजार मेट्रिक टन डांबर खरेदी करण्याचा प्रस्ताव त्यांनी स्थायी समितीसमोर मांडला आहे.
निविदा प्रक्रियेनुसार निवड करण्यात आलेल्या ठेकेदाराने १५ टक्के डिस्काउंट देण्याची तयारी दाखविली आहे. जर,डांबर बनविणाऱ्या कंपन्यांना सवलतीच्या दरात डांबर देणे शक्य नसेल, तर या कंपन्यांकडून डांबर खरेदी करून पालिकेला देणारा ठेकेदार इतक्या सवलतीच्या दरात डांबर कसा पुरवू शकेल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ठेकेदाराने डांबर पुरविले, तरी त्या डांबरचा दर्जा निश्चितच चांगला नसणार आहे. डांबर पुरविणाऱ्या कंपन्यांकडून टक्केवारी मिळत नसल्याने या खरेदीप्रक्रियेत ठेकेदार आणला जात असल्याची चर्चा महापालिकेमध्ये सुरू आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Proposal to buy tariff by the contractor instead of the company