Pune Crime: रात्री फिरताना हटकल्यामुळे पोलिसाच्याच डोळ्यात मारला मिरचीचा स्प्रे; चाकणमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 02:51 PM2023-07-28T14:51:29+5:302023-07-28T14:51:58+5:30

चाकण पोलिसांनी याप्रकरणी तिघांपैकी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत....

policeman was hit in the eye by pepper spray after he got lost while walking at night; Incidents in Chakan | Pune Crime: रात्री फिरताना हटकल्यामुळे पोलिसाच्याच डोळ्यात मारला मिरचीचा स्प्रे; चाकणमधील घटना

Pune Crime: रात्री फिरताना हटकल्यामुळे पोलिसाच्याच डोळ्यात मारला मिरचीचा स्प्रे; चाकणमधील घटना

googlenewsNext

चाकण (पुणे) : गस्त घालत असताना पोलिसांना रात्रीच्या वेळी चोरीच्या उद्देशाने संशयितरीत्या फिरत असलेल्या तिघांना हटकले असता भामट्यांनी एका पोलिस अधिकाऱ्याच्या डोळ्यात चक्क मिरचीचा स्प्रे मारल्याने एक पोलिस अधिकारी जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. चाकण, मेदनकरवाडी ( ता. खेड ) हद्दीतील बंगला वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका टपरीजवळ बुधवारी (दि. २६) रात्री सव्वाबारा वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला. चाकण पोलिसांनी याप्रकरणी तिघांपैकी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

अमोल रमेश डेरे (वय ४७, रा. चाकण) असे या घटनेत जखमी झालेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. डेरे यांनी याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. डेरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, निहाल हरपाल सिंग (वय ३५, रा.मुंबई) व मंगेश लक्ष्मण गायकवाड (वय ३२, रा. रहाटणी, पुणे) यांना अटक करण्यात आली. तर, संजय पडवळ (पूर्ण, नाव व पत्ता निष्पन्न नाही) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की, चाकण पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक अमोल डेरे हे आपल्या सहकाऱ्यासमवेत बुधवारी रात्री बारा वाजेच्या दरम्यान चाकणसह मेदनकरवाडी भागात पेट्रोलिंग करत होते. यावेळी त्यांना मेदनकरवाडी हद्दीतील एका टपरीजवळ तिघेजण संशयास्पद फिरताना दिसून आले. पोलिसांना पाहताच ते तिघेजण तेथील टपरीजवळ लपून बसले.

चोरी करण्याच्या उद्देशाने अथवा चोरी करण्याच्या तयारीत ते भामटे त्याठिकाणी आले असावेत, असा संशय पोलिसांना आल्याने पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांच्याजवळ असलेला मिरचीचा स्प्रे डेरे यांच्या डोळ्यावर फेकला. त्यात डेरे किरकोळ जखमी झाले आहेत. शासकीय कामात अडथळाही आणला. पोलिसांनी त्यांना पकडून अंगझडती घेतली असता वरील तिघांकडे बनावट प्लास्टिकची पिस्टल, मिरची स्प्रे व एक स्क्रू ड्रायव्हर मिळून आला. चाकण पोलिसांनी आरोपी सिंग व गायकवाड यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना जेरबंद केले आहे.

चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड व त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Web Title: policeman was hit in the eye by pepper spray after he got lost while walking at night; Incidents in Chakan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.