बुधवार पेठेत मध्यरात्री ३९ कुंटणखाने आणि ७०० लोकांची झडती, अल्पवयीन मुलींसह २ बांग्लादेशी महिला ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 12:14 IST2026-02-12T12:13:39+5:302026-02-12T12:14:30+5:30
बुधवार पेठेतील कुंटणखान्यांवर अशा प्रकारची व्यापक कारवाई प्रथमच झाल्याची चर्चा असून रात्री अकरा ते पहाटे पाच वाजेपर्यंत ही मोहीम सुरू होती

बुधवार पेठेत मध्यरात्री ३९ कुंटणखाने आणि ७०० लोकांची झडती, अल्पवयीन मुलींसह २ बांग्लादेशी महिला ताब्यात
पुणे : बुधवार पेठेतील कुंटणखान्यांमध्ये बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांग्लादेशी नागरिकांच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी मंगळवारी (दि. ११) मध्यरात्री मोठी धडक कारवाई केली. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या निर्देशानुसार गुन्हे शाखा व इतर पोलिस ठाण्यांच्या पथकांनी रात्री सुमारे अकराच्या सुमारास सुरू केलेल्या या मोहिमेत तब्बल ३९ कुंटणखान्यांची कसून तपासणी करण्यात आली. या कारवाईत काही अल्पवयीन मुली आणि दोन बांग्लादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आले, तर अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी रामेश्वर बिभीषण बिराजदार (रा. लातूर) याला अटक करण्यात आली.
बुधवार पेठेतील कुंटणखान्यांवर अशा प्रकारची व्यापक कारवाई प्रथमच झाल्याची चर्चा आहे. रात्री अकरा ते पहाटे पाच वाजेपर्यंत ही मोहीम सुरू होती. यामध्ये तीन पोलिस उपायुक्त, ८ सहायक पोलिस आयुक्त, सुमारे ५५ निरीक्षक, उपनिरीक्षक व ६०० पेक्षा पोलिस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. या कारवाईदरम्यान पोलिसांनी बुधवार पेठेतील ४१ इमारतींची तपासणी केली, तर सुमारे ७०० लोकांची झडती घेण्यात आली. या तपासणीत पोलिसांना दोन बांगलादेशी महिलांची सुटका करण्यात यश आलं. तसेच काही अल्पवयीन मुलींचे रेस्क्यू करण्यात आले. या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्याचे काम बुधवारी (दि. २२) रात्री उशिरापर्यंत फरासखाना पोलिस ठाण्यात सुरू होते, अशी माहिती सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख उपस्थित होते.
गुन्हे शाखेला बुधवार पेठेतील काही कुंटणखान्यांमध्ये बांग्लादेशी तरुणी वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली होती. यापूर्वीही येथून अनेक बांग्लादेशी महिलांना अटक करण्यात आली आहे. अलीकडेच एका बांग्लादेशी तरुणीने फरासखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत तिला वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या दलालांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चौकशीत एका महिला पोलिस हवालदाराचे नाव समोर आले. संबंधित हवालदाराने वरिष्ठांना माहिती न देता पीडितेला कुंटणखाना मालकिणीकडे सोपविल्याचा व पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्या महिला पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. अतिशय गोपनीय पद्धतीने ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ अधिकारी सोडता कोणालाच कोठे काय कारवाईसाठी जायचे आहे याची माहिती नव्हती. कुंटणखाने चालविणाऱ्यांना पूर्वसूचना मिळू नये म्हणून फरासखाना पोलिस ठाण्यालाही ऑपरेशन सुरू होईपर्यंत माहिती देण्यात आली नव्हती. दरम्यान, ‘बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांग्लादेशी नागरिकांच्या पार्श्वभूमीवर बुधवार पेठेत पुढेही कठोर कारवाई केली जाईल. कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही,’ असा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.