काेयता गँगचा धाक दाखवून पोलिसांनीच सराफाला लुटले; चार कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 10:33 IST2025-05-10T10:33:45+5:302025-05-10T10:33:54+5:30

चौकशीत पोलिस कर्मचारी दोषी आढळले असून पुढील दोन वर्ष त्यांची वेतनवाढ थांबवली आहे, तसेच चौघांना ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला

Police robbed a bullion shop by showing fear of Koyata gang; Action against four employees | काेयता गँगचा धाक दाखवून पोलिसांनीच सराफाला लुटले; चार कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

काेयता गँगचा धाक दाखवून पोलिसांनीच सराफाला लुटले; चार कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

पुणे : कोयता गँगमधील सराईतांकडून चोरलेले सोने खरेदी केल्याची बतावणी करून कर्नाटकातील सराफ व्यावसायिकाकडून २८ तोळे दागिने तपासासाठी घेऊन अपहार करणाऱ्या वानवडीपोलिस ठाण्यातील चार पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी परिमंडळ ५ चे पोलिस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंंदे यांनी चौघांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

पोलिस हवालदार महेश गाढवे, सर्फराज देशमुख, शिपाई संदीप साळवे, सोमनाथ कांबळे अशी कारवाई केलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. सराफ व्यावसायिक कपिल मफतलाल जैन (रा. बल्लारी, कर्नाटक) यांनी याबाबत तक्रार दिली होती. चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिस कर्मचारी गाढवे, देशमुख, साळवे, कांबळे कर्नाटकातील बल्लारी शहरात गेले होते. चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या चोरट्याकडे सुवर्णहार गहाण ठेवल्याची पावती होती. सुवर्णहार जैन यांच्याकडे गहाण ठेवण्यात आला होता. सुवर्णहार गहाण ठेवून चोरट्याला तीस हजार रुपये दिल्याची कबुली जैन यांनी दिली होती. त्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांनी जैन यांना धमकाविले. तुझ्याकडे आणखी १०० तोळे सोने असून, ते चोरांकडून घेतले आहे, अशी धमकी दिली. तू ज्यांच्याकडून सोन घेतले आहे. ते चोरटे कोयता गँगमधील असून, त्यांनी पोलिसांवरदेखील हल्ला केला आहे, असे सराफ व्यावसायिक जैन यांना सांगण्यात आले. तडजोडीत जैन यांनी बल्लारीत तपासासाठी आलेल्या पोलिसांना २८ तोळे सोन्याचे दागिने दिले.

जैन यांच्याकडील सोने घेऊन वानवडी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी पुण्याकडे आले. जैन यांनी बल्लारीतील पोलिस ठाण्यात जाऊन चौकशी केली. त्यानंतर त्यांनी वानवडी पोलिस ठाण्यात जाऊन चौकशी केली. तेव्हा अशा प्रकारचा कोणताही गुन्हा दाखल झाला नाही, असे वानवडी पोलिसांनी त्यांना सांगितले. पोलिसांनी चोरट्यांकडून सोनेही जप्त केले नसल्याचे त्यांनी सांगितले. पोलिस कर्मचारी गाढवे, देशमुख, साळवे, कांबळे यांनी सोने वाटून घेतल्याचे उघडकीस आले. त्यानंतर जैन यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणाची चौकशी करण्यात आली. परिमंडळ ५ चे पोलिस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांनी चौघांची चौकशी केली. चौकशीत पोलिस कर्मचारी दोषी आढळले. ‘पुढील दोन वर्ष तुमची वेतनवाढ का रोखू नये ?’, अशी नोटीस बजावण्यात आली, तसेच चौघांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

Web Title: Police robbed a bullion shop by showing fear of Koyata gang; Action against four employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.