पोलिसांनी नोंदवला शीतल तेजवाणीचा जबाब; दिग्विजय पाटलांना नोटीस, पुणे पोलिसांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 11:53 IST2025-11-20T11:53:28+5:302025-11-20T11:53:44+5:30
मुंढवा जमीन प्रकरणात २७५ व्यक्ती असून, तेजवाणी यांना संबंधित व्यक्तींनी ही जमीन पॉवर ऑफ ॲटर्नी करून दिली आहे

पोलिसांनी नोंदवला शीतल तेजवाणीचा जबाब; दिग्विजय पाटलांना नोटीस, पुणे पोलिसांची माहिती
पुणे : शहरातील मुंढवा परिसरातील कथित जमीन घोटाळा प्रकरणातील शीतल तेजवाणी यांनी मंगळवारी पुणेपोलिसांसमोर आपला जबाब नोंदवला आहे. तत्पूर्वी संबंधित जमीन लिहून देणाऱ्या व्यक्तींनाही पोलिसांनी चौकशीला बोलाविले असून, त्यातील काहींनी सोमवारी पोलिसांसमोर जबाब नोंदवला, तर काही जण पुन्हा जबाब नोंदवू असे म्हटल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया’ कंपनीने कोरेगाव पार्क भागातील ४० एकर जमीन अनियमितपणे खरेदी केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास केला जात आहे. ‘जमीन व्यवहार प्रकरणात पोलिसांनी हेमंत गवंडे, शीतल तेजवाणी, दिग्विजय पाटील, तहसीलदार सूर्यकांत येवले यांना जबाब नोंदविण्याबाबत नोटीस बजावली आहे. हेमंत गवंडे यांनी सोमवारी जबाब नोंदविला. त्यानंतर मंगळवारी शीतल तेजवाणी या जबाब नोंदविण्यास हजर राहिल्या, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. तेजवाणी यांनी जबाब नोंदविला असून, त्याचे अवलोकन सुरू आहे. या प्रकरणात विविध शासकीय विभागांकडून कागदपत्रे मागविण्यात आली असून कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. तपासात गरज भासल्यास शीतल तेजवाणी यांना पुन्हा चौकशीसाठी बोलवले जाईल, दिग्विजय पाटील यांना नोटीस देण्यात आली असून, ते अद्याप जबाब नोंदविण्यासाठी हजर राहिले नाहीत’, असेही पोलिस आयुक्तांनी सांगितले.
दरम्यान, मुंढवा जमीन प्रकरणात २७५ व्यक्ती असून, तेजवाणी यांना संबंधित व्यक्तींनी ही जमीन पॉवर ऑफ ॲटर्नी करून दिली आहे. त्या अनुषंगाने तेजवाणी यांना या जमिनीबाबत नेमके काय लिहून दिले, या व्यक्तींना काही मोबदला दिला गेला किंवा मिळाला आहे का, तसेच या व्यक्तींनी जमीनबाबत त्यांना हक्क कसा दिला, याचा तपास केला जात आहे. संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी बोलावल्यानंतर सोमवारी १० ते १२ व्यक्ती हजर राहिल्या. त्यातील काहींनी आम्ही नंतर जबाब देऊ, अशी भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे.