जखमींच्या मदतीला धावले पोलीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 19:44 IST2018-08-27T19:43:16+5:302018-08-27T19:44:07+5:30
रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात पोहचवण्यास रिक्षा चालकांनी नकार दिला.

जखमींच्या मदतीला धावले पोलीस
पुणे : रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात पोहचवण्यास रिक्षा चालकांनी नकार दिला. मात्र, ही बाब पेट्रोलिंग करणा-या मुंढवापोलिसांना समजताच त्यांनी दोन्ही अपघातग्रस्तांना गस्तीच्या वाहनातूनच रुग्णालयात पोहचवले. पोलिसांनी दाखलेल्या माणूसकीमुळे दोन्ही अपघातग्रस्तांना वेळेवर उपचार मिळू शकले.
मुंढवा पोलीस केशवनगर भागात पेट्रोलिंग करत असताना त्यांना अनुजा बापु पवार यांनी येऊन कळवले, की त्यांची मुलगी योगिता व शेजारी राहणारी महिला रेणुकामाता मंदिर येथे दुचाकीवरुन पडून जखमी झाल्या आहेत. त्यांना रिक्षाचालक रुग्णालयापर्यंत पोहचवण्यास नकार देत आहेत. ही माहिती मिळताच पोलीस हवालदार एस. एल. मगर, वाघोले आणि पोलीस शिपाई सोडनवर यांनी जखमींना पेट्रोलिंगच्या गाडीत बसवले. यानंतर त्यांना खराडी परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करुन डॉक्टरांना उपचार करण्यास सांगितले. जखमींना तातडीची मदत मिळाल्याने जीवदान मिळाले. पोलिसांनी दाखविलेल्या या माणूसकीमुळे जखमींच्या नातेवाईकांनाही दिलासा मिळाला.