दोषारोपपत्र दाखल करण्यात पोलिसांना अपयश; गँगस्टर टिपू पठाणसह ६ आरोपींना जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 10:33 IST2026-02-14T10:32:02+5:302026-02-14T10:33:19+5:30
पोलिसांनी ९० दिवसांच्या आत दोषारोप पत्र दाखल करणे जरुरीचे होते. तसेच, वेळेत मुदतवाढ घेणे आवश्यक होते. परंतु, पोलिसांनी ८९ व्या दिवशी मुदतवाढ अर्ज दाखल केला

दोषारोपपत्र दाखल करण्यात पोलिसांना अपयश; गँगस्टर टिपू पठाणसह ६ आरोपींना जामीन मंजूर
पुणे : कुख्यात गँगस्टर टिपू पठाण याच्या टोळीविरुद्ध वेळेत दोषारोपपत्र दाखल न केल्यामुळे न्यायालयाने पठाणसह सहा आरोपींना जामीन मंजूर केला असून, आवश्यक त्या कारवाईसाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना निकालाची प्रत द्यावी, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. विशेष मोक्का न्यायाधीश एस. एस. कंठाळे यांनी हा आदेश दिला.
रिजवान ऊर्फ टिपू सत्तार पठाण, इजाज सत्तार पठाण, सद्दाम सलीम पठाण, अजीम ऊर्फ अंट्या मोहम्मद हुसेन शेख, मतीन हकीम सय्यद आणि तन्वीर शकील शेख अशी जामीन मंजूर झालेल्यांची नावे आहेत. ॲड. बिलाल शेख यांनी विशेष मोक्का न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. ॲड शेख यांनी युक्तिवाद केला की, पोलिसांनी ९० दिवसांच्या आत दोषारोप पत्र दाखल करणे जरुरीचे होते. तसेच, वेळेत मुदतवाढ घेणे आवश्यक होते. परंतु, पोलिसांनी ८९ व्या दिवशी मुदतवाढ अर्ज दाखल केला. न्यायालयाने हे प्रकरण सुनावणीसाठी ७ फेब्रुवारी रोजी ठेवले व आरोपींना नोटीस बजावायचे आदेश दिले. या नोटिशीची पूर्तता करून अहवाल दाखल करण्याचे आदेश दिले, परंतु पोलिसांनी आरोपींना ७ फेब्रुवारी २०२६ ची नोटीस बजावली नाही, चुकीचा व न्यायालयाची दिशाभूल करणारा अहवाल न्यायालयात दाखल केला. त्यात येरवडा कारागृहाला ६ फेब्रुवारी रोजी आरोपींना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्याचे पत्र पोलिसांनी सादर केले. प्रत्यक्षात न्यायालयाने ६ फेब्रुवारीला सुनावणी ठेवलेली नव्हती. टिपू पठाण व टोळीवर ९० दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करण्यात पोलिसांना अपयश आल्यामुळे न्यायालयाने सहा आरोपींना १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
आरोपींनी ३ वर्षे किंवा खटला पूर्ण होईपर्यंत पुणे शहरात प्रवेश करू नये. फक्त खटल्याच्या नियोजित तारखांना उपस्थित राहण्यासाठी किंवा पोलिसांनी बोलविल्यानंतर उपस्थित राहण्याच्या उद्देशाशिवाय शहरात येऊ नये. या आदेशाची प्रत माहिती आणि आवश्यक कारवाईसाठी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना कळवावी. असे या निकालात म्हटले आहे. आरोपींच्या वतीने ॲड. केदार खोपडे आणि ॲड. आझम काझी यांनी सहकार्य केले.