पोलिसांनी आवाहन करूनही ऐकत नाहीत; पुण्यात नववर्षाच्या रात्री २०८ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 10:04 IST2026-01-02T10:04:04+5:302026-01-02T10:04:15+5:30
कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पोलिसांकडून मद्यप्राशन करून वाहने चालवणाऱ्या वाहनचालकांविरोधात नियमित कारवाई करण्यात येत आहे.

पोलिसांनी आवाहन करूनही ऐकत नाहीत; पुण्यात नववर्षाच्या रात्री २०८ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई
पुणे : नववर्षाच्या रात्री मद्यप्राशन करून भरधाव वेगाने वाहने चालवणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनीकारवाई केली. वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी करून शहराच्या वेगवेगळ्या भागात २०८ मद्यपी वाहनचालकांविरोधात कायदेशीर कारवाई करून त्यांच्याविरुद्ध खटले दाखल करण्यात आले आहेत.
नववर्षाच्या स्वागताला भरधाव वेगाने वाहने चालवल्यामुळे गंभीर स्वरूपाचे अपघात घडण्याची दाट शक्यता लक्षात घेता, अशा प्रकारचे अपघात रोखण्यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मद्यपी वाहनचालकांंविरोधात कडक कारवाईचे आदेश दिले होते. नववर्षाच्या स्वागताला मद्यप्राशन करून वाहने चालवणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम (ड्रंक अँड ड्राइव्ह) राबवली. शहरातील वेगवेगळ्या भागात २९ ठिकाणी वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी केली. या कारवाईत २०८ वाहनचालकांनी मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले. वाहतूक पोलिसांनी कारवाईसाठी ब्रेथ ॲनलायजर यंत्राचा वापर केला. यंत्राला जोडलेली प्लास्टिक नळी (ब्लोअर पाइप) प्रत्येक तपासणीनंतर नष्ट करण्यात आली. नववर्षाच्या रात्री ११ ते पहाटे पाचपर्यंत शहराच्या वेगवेगळ्या भागात २०८ मद्यपी वाहनचालकांविरोधात कारवाई करण्यात आली, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.
या कारवाईसाठी वाहतूक पोलिसांना स्थानिक पोलिसांनी सहकार्य केले. मुंढवा, बाणेर, कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, येरवडा, बालेवाडी परिसरात पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला होता. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पोलिसांकडून मद्यप्राशन करून वाहने चालवणाऱ्या वाहनचालकांविरोधात नियमित कारवाई करण्यात येत आहे. ख्रिसमसपासून पोलिसांनी ही कारवाई आणखीनच तीव्र केली. रेस्टारँट, बार, मद्यविक्री दुकानांच्या परिसरात वाहनचालकांचे प्रबोधन करणारी भीत्तीचित्रे लावण्यात आली होती. मद्यप्राशन करून वाहने चालवू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले होते.