आंदेकर टोळीच्या गुंडांची पोलिसांनी काढली धिंड; नाना पेठ, गणेश पेठेतून फिरविले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 16:46 IST2025-11-21T16:45:09+5:302025-11-21T16:46:13+5:30
आंदेकर टोळीची दहशत कमी करण्यासाठी समर्थ पोलिसांनी टोळीची दहशत असलेल्याच नाना पेठ व भवानी पेठेतून धिंड काढली

आंदेकर टोळीच्या गुंडांची पोलिसांनी काढली धिंड; नाना पेठ, गणेश पेठेतून फिरविले
पुणे: कुख्यात बंडु आंदेकर टोळीची दहशत कमी करण्यासाठी समर्थ पोलिसांनी टोळीची दहशत असलेल्याच नाना पेठ व भवानी पेठेतून कृष्णा आंदेकर, अभिषेक आंदेकर आणि शिवराज आंदेकर या तिघांची धिंड काढली.
माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनानंतर कुख्यात बंडु आंदेकर टोळी आणि सोमनाथ गायकवाड टोळीमध्ये वितुष्ट निर्माण झाले आहे. वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने गुंड गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याचा सप्टेंबरमध्ये खून केला. या प्रकरणी समर्थ पोलिसांनी बंडु आंदेकर यांच्यासह आंदेकर घरातील अनेकांना अटक करून टोळीतील सदस्यांना जेरबंद करत त्यांच्या घरांची झाडाझडती घेत मालमत्तेवर टाच आणली. त्यानंतर समर्थ पोलिसांनी कोमकर हत्येतील आरोपी कृष्णा आंदेकर, अभिषेक आंदेकर आणि शिवराज आंदेकर यांच्या घराची झडती घेऊन या तिघांचीही नाना पेठेसह गणेश पेठेत फिरवून धिंड काढली. यावेळी पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, आयुष कोमकर खुन प्रकरणात पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.
बंडू आंदेकर टोळी सध्या तुरुंगात आहे. त्यांना अटक केल्यानंतर त्यांची सर्व मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. तसेच त्यांनी बांधलेले अनधिकृत बांधकाम, उद्योगधंदे, प्रतिष्ठा मिळवण्यासाठी बांधलेल्या कमानी असे सर्व काही उध्वस्त करण्यात आले आहेत. त्यांनी बळकावलेल्या जमिनीही महापालिकेने जप्त केल्या आहेत. आता त्यांची पुणे शहरातील दहशत कमी करण्याचा विडा पोलिसांनी उचलला आहे. त्या अनुषंगाने मध्यवर्ती भागातूनच आंदेकर टोळीची धिंड काढण्यात आली आहे.